मराठा आरक्षणप्रश्नी विधानभवनात सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक
एबीपी माझा वेब टीम | 27 Jul 2018 07:55 AM (IST)
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या 'सेवासदन' या निवासस्थानी मध्यरात्री उशिरापर्यंत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली
मुंबई : मराठा आरक्षणप्रश्नी तोडगा काढण्यासाठी विधान भवनात सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक घेण्यात येणार आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या 'सेवासदन' या निवासस्थानी मध्यरात्री उशिरापर्यंत चाललेल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय झाला. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी उद्या (शनिवारी) विधान भवनात विधानसभा आणि विधानपरिषदेच्या सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक घेण्यात येणार आहे. हा प्रश्न कोणत्या एका पक्षाचा नाही, त्यामुळे सर्वपक्षीय तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, रावसाहेब दानवे यांच्यासह सुभाष देशमुख, आशिष शेलार, रवींद्र चव्हाण, रणजित पाटील, बबनराव लोणीकर, गिरीष महाजन हे नेते उपस्थित होते.