Navi Mumbai Fire : नवी मुंबईच्या (Navi Mumbai) पावणे एमआयडीसीतील एका रासायनिक कंपनीला भीषण आग लागली. दुपारच्या सुमारास लागलेली ही आग तब्बल आठ तासानंतर आटोक्यात आली. या आगीत दोन कामगार बेपत्ता झाले असून तिघे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान अजूनपर्यंत कुलिंगचं काम सुरु आहे.


नवी  मुंबईच्या पावणे एमआयडीसीतील वेस्ट क्लाय पॉलिकॅब या रासायनिक कंपनीला आग लागली होती. ही आग इतकी भीषण होती की, या आगीत आजूबाजूच्या चार कंपन्या जळून खाक झाल्या.पावणे एमआयडीस मध्ये लागलेली ही आग आठ ते नऊ तासानंतर नियंत्रणात आली. यानंतर अजूनपर्यंत केमिकल कंपनीत कुलिंगचे काम चालू आहे. सोबतच आजूबाजूला लागलेल्या कंपनीतील आग विझवण्यात देखील अग्निशमन विभागाला यश आलं आहे.


दरम्यान ही आग  एमआयडीसी अग्निशमन विभागाच्या हलगर्जीपणामुळे आग वाढली असल्याचा आरोप स्थानिक नगरसेवक आणि माजी महापौरांनी केला आहे.  या विभागाकडे गाड्यांची कमतरता असून अनेक गाड्या खराब असल्याने घटनास्थळी गाड्या पोहोचण्यास उशीर झाला. तसेच फोम कमी असल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यास उशीर झाला असल्याचं देखील बोललं जात आहे. एमआयडीसी मधील जवळपास 4 हजार कंपण्या रामभरोसे असल्याचा आरोप केला आहे. 


मित्राला व्हिडीओ कॉलवर आग दाखवली अन् तो बेपत्ता झाला 


या आगीत एक व्यक्ती जो बेपत्ता आहे. त्यांनी आग लागल्यानंतर आपल्या एका परदेशातील मित्रासोबत व्हिडीओ कॉल केला होता. निखिल पासीलकर असं या बेपत्ता व्यक्तिचं नाव आहे. ते त्यांच्या परदेशातील मित्रासोबत व्हिडिओ कॉलद्वारे बोलत होते. त्यांच्या मित्राचा दावा आहे की तो बोलत असताना निखिलने त्याला आग दाखवली आणि अचानक फोन खाली पडला. त्या मित्राने निखिलच्या घरच्यांना कळवले.  कुटुंबीय त्याला फोन करत होते पण तो फोन उचलत नव्हता. नंतर संध्याकाळी त्यांच्या फोन बंद झाला. पासीलकर हे वेस्ट पोस्ट पॉलीकेमच्या प्रयोगशाळेत पर्यवेक्षक म्हणून काम करतात. पासिलकर हे कल्याणमध्ये राहतात आणि पालकांसह त्याचे संपूर्ण कुटुंब कंपनीच्या बाहेर थांबले आहे. निखिलच्या काकाने सांगितले की ते पोलिसांनाही भेटले पण ते त्यांना थांबायला सांगितलं आहे.