नवी मुंबई : प्लास्टिक पिशवी बंदीचा प्रसार करण्यासाठी नवी मुंबईतील दूध व्यावसायिकाने अनोखी शक्कल लढवली आहे. भांड्यातून दूध घेऊन जाणाऱ्या ग्राहकाला या दूध व्यावसायिकाकडून आईस्क्रीम भेट दिली जात आहे.


राज्य सरकारच्या प्लास्टिकबंदीच्या निर्णयानंतर त्याला अनेक व्यापाऱ्यांचा विरोध आहे. तर काही जण या निर्णयाचं स्वागत करत आहेत. नवी मुंबईतील सीवूड येथे डेअरीचा व्यावसाय करणारे राजेंद्र कुमार हे देखील प्लास्टिकबंदीचा प्रसार करत आहेत.

आपल्या डेअरीमध्ये दूध, दही घेण्यासाठी घरातून भांडी आणल्यास त्याला एक आईस्क्रीम फ्री देण्यात येत आहे. प्लास्टिकबंदी निर्णयाची जनजागृती व्हावी यासाठी ही योजना राबवण्यात येत असल्याचं राजेंद्र कुमार यांनी सांगितलं.

राज्यात प्लास्टिकबंदी लागू झाल्यानंतर प्लास्टिक वापरणाऱ्या विक्रेता आणि ग्राहकावर कारवाई केली जात आहे. पहिल्यांदा प्लास्टिक वापरताना आढळून आल्यास पाच हजार रुपयांचा दंड आहे. त्यामुळे ग्राहक प्लास्टिक वापरणं टाळत असल्याचं चित्र आहे.

दरम्यान, प्लास्टिकबंदीच्या निर्णयात बदल करत पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी छोट्या किराणा दुकानदारांना मोठा दिलासा दिला आहे. पॅकेजिंगसाठी मोठ्या व्यापाऱ्यांप्रमाणेच या दुकानदारांनाही प्लास्टिक वापरण्याची मुभा देण्यात आली आहे.