मुंबई : मुंबईतील उच्चभ्रू परिसरापैकी एक असलेल्या वांद्रेमध्ये हत्येची घटना घडली आहे. एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तरुणाने आपल्या प्रेयसीचा खून केला. तिच्या सततच्या पैसे मागण्याच्या सवयीने तो कंटाळला होता. 


गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी सांगितलं की, "क्राईम ब्रान्चच्या युनिट 9 ने काही तासांच्या आतच या प्रकरणाचा छडा लावला. आरोपीला अटक करुन त्याला वांद्रे पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. बिपिन विनोद कंडुलना असं अटकेत असलेल्या आरोपीचं नावं आहे. तर इशिता कुंजुर असं त्याच्या मृत प्रेयसीचं नाव आहे."


वांद्रे पोलीस स्टेशनमधील एका अधिकाऱ्याच्याच्या माहितीनुसार, "ही घटना सोमवार (31 मे) सकाळी घडली. सगळीकडे शांतता असतानाच या दोघांमध्ये भांडण झालं. हा वाद एवढा टोका गेला की संतापलेल्या बिपिनने इशिताची गळा दाबून हत्या केली."


जवळपास दीड वर्षांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली. ओळखीचं रुपांतर आधी मैत्रीत झालं, मग दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. आरोपी वांद्र्यातील एका मोठ्या हॉटेलमध्ये काम करतो तर तरुणी घरकाम करायची. 


रविवारी (30 मे) रात्री तरुण बिपिनच्या लाल मिठी परिसरातील घरात गेली होती. तिथे त्यांच्यात शारीरिक संबंध झाले. त्यानंतर तरुणीने बिपिनकडे दीड लाख रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाही तर बलात्काराच्या खोट्या आरोपाखाली तुला अडकवेन अशी धमकी तिने बिपिनला दिली. यानंतर बिपिनने इशिताला समजावण्याचा प्रयत्न केला आणि दोघे रात्री वांद्रे रिक्लमेशन परिसरात फिरायला गेले.


यानंतरही इशिता ऐकण्यास तयार नव्हती. वांद्र्यातील सेंट फ्रान्सिस्को परिसरात आल्यावर इशिता पुन्हा पैशांची मागणी करु लागली. यावेळी इशिता स्वत:चे कपडे फाडू लागली आणि जोरजोरात आरडाओरडा करु लागली. यामुळे बिपिन घाबरला आणि त्याने इशिताचा गळा दाबला.


बिपिनने तिचा गळा एवढ्या जोरात दाबला की त्यातच तिचा मृत्यू झाला. घाबरलेला बिपिनने तिथून पळ काढला. सकाळी पोलिसांना हत्येची माहिती मिळाली आणि त्यांनी गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली. क्राईम ब्रान्च युनिट 9 चे प्रभारी निरीक्षक संजय खताळे यांनी पोलीस निरीक्षक सुधीर जाधव आणि अन्य लोकांचं पथक स्थापन केलं.


या पथकाने सीसीटीव्ही फूटेज तपासलं आणि 12 तासांच्या आतच आरोपीच्या मुसक्या आवळल्या. चौकशीत बिपिनने सांगितलं की, "इशिता कायम आपल्याकडे पैसे मागत असे." इशिताची हत्या केल्यानंतर तो आपल्या हॉटेलवर गेला, तिथून 15 हजार रुपये घेतले आणि मुंबईतून पळ काढण्याच्या प्रयत्नात असतानाच तो पोलिसांच्या हाती सापडला.