नवी मुंबई : महापालिकेच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगानं काढलेल्या प्रभाग रचना सोडतीमध्ये फिक्सिंग झाली आहे. महापालिकेतील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून जे नगरसेवक सभागृहात प्रशासनाला धारेवर धरतात, सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणतात, त्यांचे प्रभाग मुद्दाम आरक्षित करण्यात आले आहेत. यामागे भाजप आमदार गणेश नाईक यांचा हात असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे नगरसेवक एम. के. मढवी यांनी केला आहे. सोमवारी उच्च न्यायालयात प्रभाग आरक्षण सोडतीवर सुनावणी होणार आहे.


नवी मुंबई महापालिकेच्या सभागृहामध्ये जे नगरसेवक अभ्यासपूर्वक आणि आक्रमकपणे बोलतात. त्या सर्वच नगरसेवकांचे प्रभाग या सोडतीमध्ये आरक्षित झाले आहेत. त्यामुळे ही सोडत संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या निवडणुकीची प्रभाग आरक्षण सोडत काढताना रोटेशन पद्धती 2005 पासून दाखवण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात रोटेशन पद्धतीसाठी 2006 उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. याचा निकाल 2007 साली लागला त्यानंतर रोटेशन पद्धत 2011 पासून अस्तित्वात आली. मात्र 2005 रोटेशन पध्दतीची चुकीची माहिती महापालिकेचे तत्कालीन उपायुक्त अमोल यादव आणि निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी वरिष्ठाना देऊन त्यांची दिशाभूल केली आहे. फिक्‍सिंग झालेल्या या सोडतीची तयारी नाईकांच्या वाईट हाऊसमध्ये दोन महिन्यांपासून सुरु होती. सोडतीमध्ये फिक्सिंग करण्यासाठी तत्कालीन भाजप सरकारनं या अधिकाऱ्यांना मुद्दामून नवी मुंबई पाठवलं होतं, असा आरोप एम. के. मढवी यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे.


सहावी निवडणूक चौथी निवडणूक दाखवली


नवी मुंबई महापालिकेची आता होणारी सार्वत्रिक निवडणूक ही सहावी निवडणूक आहे. मात्र या निवडणुकीची आरक्षण सोडत काढताना महापालिका प्रशासनानं ही निवडणूक चौथी असल्याचं दाखवलं आहे, असाही गौप्यस्फोट मढवी यांनी केला आहे.