नवी मुंबई : नवी मुंबईतील 'सिडको'च्या 15 हजार घरांसाठी तब्बल दोन लाख अर्ज आले आहेत. ज्यांनी यापूर्वी नोंदणी केली आहे, त्यांना आज रात्री बारा वाजेपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. घरांची ऑनलाईन सोडत 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता निघणार आहे.
सिडकोच्या माध्यमातून घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा, द्रोणागिरी या पाच नोडमध्ये अल्प उत्पन्न आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी 15 हजारच्या आसपास घरं उभारली जात आहेत. अपेक्षेप्रमाणे या प्रकल्पाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
सर्वसामान्य ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन सिडकोने विविध आर्थिक गटांसाठी नवी मुंबई क्षेत्रात पुढील वर्षभरात 55 हजार घरं बांधण्याचा निर्धार केला आहे. त्यापैकी 14 हजार 820 घरांचं बांधकाम प्रगतिपथावर आहे.
एमएमआरडीए रेंजमध्ये म्हणजेच मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली भागात ज्यांच्या नावावर घर आहे, त्यांना या घराचा लाभ घेता येणार नाही.
Cidco Lottery 2018: सिडको लॉटरी, घरांच्या किमती, एरिया आणि सर्व काही
सिडकोने याआधी विविध गृहप्रकल्प उभारले आहेत, परंतु एकाच वेळी 14 हजार 820 घरांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा गृहप्रकल्प ठरला आहे. या प्रकल्पातील अत्यल्प गटातील घरं पंतप्रधान आवास योजनेसाठी असतील.
सिडकोने आतापर्यंत विविध घटकांसाठी सव्वा लाख घरांची निर्मिती केली आहे. परंतु मध्यंतरीच्या काळात बजेटमधील घरांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला होता. आजही सिडकोच्या घरांना सर्वसामान्य घटकांची पसंती आहे, त्यामुळेच आगामी काळात विविध घटकांसाठी घरांची निर्मिती करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.
पंधरा हजार घरांचा पहिला टप्पा पूर्ण करतानाच पुढील वर्षभरात 40 हजार घरांचा नवा आराखडा तयार करण्यात आला आहे. या घरांच्या बांधकामालाही लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे.