नवी मुंबई : सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबई क्षेत्रात घोषित केलेल्या महागृहनिर्माण प्रकल्पाची लॉटरी आज निघाली. ही सोडत ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली असून याची लिंक सिडकोच्या वेबसाईटवर टाकण्यात आल्याने लाभार्थ्यांना घरात बसून ही सोडत पाहता आली.

सिडकोने एकूण 14 हजार 838 घरांची ही लॉटरी काढली होती. घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरी येथे ही घरे उभारण्यात येणार आहेत. आर्थिक दुर्बल घटकांसाठी 18 लाख आणि अल्प उत्पन्न गटासाठी 26 लाख रूपयांना घरांच्या किंमती ठेवण्यात आल्या होत्या.

सिडकोने काढलेल्या या लॉटरीवर लोकांच्या उड्या पडल्या. एकूण एक लाख 91 हजार 898 लोकांनी अर्ज दाखल केले होते. सिडको भवनमध्ये या लॉटरीची सोडत काढण्यात आली. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली होती.

सोडत काढल्यानंतर ज्यांना घर लागलं आहे ती यादी सिडकोच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आली आहे. या लॉटरीसाठी अनेकांनी सिडको भवनमध्ये उपस्थिती लावली.

मुंबईत येऊन अनेक वर्ष झाल्यानंतर हक्काचं घर मिळाल्याने लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं समाधान होतं. आपलं नाव दिसताच अनेकांनी जल्लोष व्यक्त केला. सिडकोची घरं स्वस्त असल्याने हक्काच्या घराचं स्वप्न साकार झाल्याचं समाधान लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर होतं.

नवी मुंबईत मेट्रोचं जाळं सुरू होणार आहे. याचा फायदा आपल्या घरांना होणार असल्यामुळे या घरात रहायला जाण्यासाठी लाभार्थ्यांमध्ये एक प्रकारची उत्सुकता आहे.

सर्वसामान्य ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन सिडकोने विविध आर्थिक गटांसाठी नवी मुंबई क्षेत्रात पुढील वर्षभरात 55 हजार घरं बांधण्याचा निर्धार केला आहे. त्यापैकी 14 हजार 820 घरांचं बांधकाम प्रगतीपथावर आहे.