मुंबई : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयांपैकी एक असलेल्या जेजे रुग्णालयात किडनी ट्रान्सप्लान्ट घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. रुग्ण जमालुद्दीन खान यांच्या कुटुंबीयांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मदत घेतली होती, कारण त्यांना तात्काळ प्रत्यारोपणाची आवश्यकता होती.

अनेक रुग्णालयांमध्ये पोहोचलेल्या या रॅकेटमध्ये कर्मचारी आणि एजंटचाही यात समावेश आहे. एसीबीने सोमवारी (1 ऑक्टोबर) जेजे रुग्णालयाचा कर्मचारी तुषार सावरकरला अटक केली. तुषार सावरकर हा प्रत्यारोपण प्राधिकरण समितीच्या (ट्रान्सप्लान्ट ऑथरायझेशन कमिटी) मुंबई विभागाच्या समन्वयकांपैकी एक आहे. मुंबई मिरर या इंग्लिश वृत्तपत्राने या संदर्भात वृत्त प्रकाशित केलं आहे.

दुसऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या
तर दुसरा आरोपी सचिन साळवे हा माहिमच्या एसएल रहेजा रुग्णालयात प्रत्यारोपण समन्वयक आहे. मालाडच्या जमालुद्दीन खान यांना रहेजा हॉस्पिटलमध्ये किडनी प्रत्यारोपणासाठी मंजुरी देण्याच्या मोबदल्यात या दोघांनी 1.5 लाख रुपयांची मागणी केल्याने अटक करण्यात आली.

रुग्ण जमालुद्दीन खान (वय 40 वर्ष) यांना किडनी ट्रान्सप्लान्टची तात्काळ आवश्यकता होती. किडनी प्रत्यारोपणासाठी जेजे रुग्णालयाच्या अवयव प्रत्यारोपण समितीने दाता रुग्णाशी संबंधित आहे की नाही, याबाबत विचारणा केली होती, अशी माहिती एसीबीच्या सूत्रांनी दिली. यानंतर लाचेच्या या रकमेबाबत सावरकर आणि साळवे यांच्याशी बातचीत केल्यानंतर रुग्णाच्या कुटुंबीयांनी 28 सप्टेंबरला एसीबीला संपर्क केला होता.

आधी लाच द्या, मग फाईल मंजूर होईल
यानंतर सावरकर आणि साळवे यांनी नातेवाईकांशी संपर्क केला आणि त्यांना दीड लाख रुपये द्यावे लागतील, मगच फाईल क्लिअर करु, असं सांगितलं. सोमवारी दुपारी रुग्णाच्या नातेवाईकांकडून 80 हजार रुपये घेण्यासाठी आले असता, एसीबीने दोघांना रंगेहाथ पकडलं.

सरकारच्या नियमानुसार, राज्यातील खासगी किंवा सरकारी रुग्णालयात अवयव प्रत्यारोपण करण्यासाठी प्रत्यारोपण समितीची मंजुरी आवश्यक आहे. रुग्ण जमालुद्दीन यांचा भाऊ झाकिर हुसेन यांच्या माहितीनुसार, "माझा भाऊ तीन वर्षांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होता. चार महिन्यांपूर्वी त्याची किडनी निकामी झाली, तेव्हापासून त्यांना नियमित डायलिलिसवर ठेवलं होतं."

आमचं संपूर्ण कुटुंब भावाच्या मदतीसाठी पुढे आलं आणि आमच्या वहिनीची किडनी दान करण्यासाठी मॅच झाली. आम्हाला रहेजा रुग्णालयात पाठवलं होतं. तिथे सचिन साळवेने जेजे रुग्णालयातील तुषार सावरकरची भेट घडवून देण्यासाठीही दहा हजार रुपये घेतले होते. जमालुद्दीन यांची प्रकृती ढासळत असल्याने त्यांना तातडीने प्रत्यारोपणाची गरज आहे. अधिकारी घोटाळा उघड करण्यासाठी अधिकारी मदत करतील, अशी आशा आम्हाला आहे," असंही झाकिर हुसेन यांनी सांगितलं.