नवी मुंबई : एअरहॉस्टेसच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी तिच्या बॉयफ्रेण्डला बेड्या ठोकल्या आहेत. नवी मुंबईत 26 वर्षीय गीतांजली उगाळेने 8 फेब्रुवारी रोजी उंदीर मारण्याचं औषध पिऊन आत्महत्या केली होती.


27 वर्षीय अमोल दाभाडे आणि गीतांजली गेल्या सात वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते. मात्र डिसेंबर महिन्यात अमोलने दुसऱ्याच तरुणीशी साखरपुडा केल्यामुळे व्यथित झालेल्या गीतांजलीने टोकाचं पाऊल उचललं.

गीतांजली कनिष्ठ जातीची असल्याचं कारण सांगत अमोलने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. या प्रकारामुळे गीतांजली निराश झाली होती. 'मिड डे' वर्तमानपत्राने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

8 फेब्रुवारीला गीतांजलीने ड्युटीवर जात असल्याचं सांगून घर सोडलं. त्याऐवजी ती वाशीत राहणाऱ्या मैत्रिणीच्या घरी गेली. मैत्रिणीने गीतांजलीला समजवण्याचा परोपरीने प्रयत्न केला, मात्र ती त्या मनस्थितीत नव्हती.

मैत्रिण मार्केटमध्ये गेल्याची संधी साधून गीतांजलीने उंदीर मारण्याचं औषध प्यायलं. घरी परतल्यावर मैत्रिणीला हा प्रकार लक्षात आला. तिने तात्काळ गीतांजलीला वाशीतील सरकारी रुग्णालयात नेलं. मात्र तिला मृत घोषित करण्यात आलं.

गीतांजलीची आई आणि बहिणीने चेंबुर पोलिसात अमोलविरोधात तक्रार दाखल केली होती. तीन दिवसांपूर्वी पोलिसांनी त्याला अटक केली. 'गेल्या दोन वर्षांपासून अमोलचं वागणं प्रचंड बदललं होतं. तो तिच्यावर अनेक वेळा शारीरिक अत्याचार करत असे' असा आरोप गीतांजलीच्या कुटुंबीयांनी केला होता. अमोलला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.