मुंबई: दहावीच्या नव्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकांची प्रतीक्षा आज संपली. यापुढे इयत्ता दहावीसाठी नवीन अभ्यासक्रम असणार आहे. दादरच्या शिवाजी मंदिरात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नवीन पुस्तकांचं प्रकाशन केलं. तसंच काही विद्यार्थ्यांना या पुस्तकांचं वाटपही केलं. त्यामुळे आजपासून नवी पुस्तके किरकोळ पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध होणार आहेत.
दहावीच्या पुस्तकातला कोणताही धडा यापुढे ऑप्शनला टाकता येणार नाही. सर्व धडे शिक्षकांना शिकवावे लागणार आहेत. ऑनलाईन पद्धतीवर आधारित दहावीचा अभ्यासक्रम तयार करण्यात आल्याचं यावेळी तावडेंनी सांगितलं. मात्र यंदा नव्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकांच्या किंमतीत 10 रुपयांनी वाढ केली गेली आहे, त्यामुळे पालकांच्या खिशाला झळ बसणार आहे.
नव्या अभ्यासक्रमांची पुस्तकं वेळेत आल्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. शिवाय पुस्तकांच्या किंमतीतली वाढ ही स्वाभाविक आहे. कारण, पुस्तकांची गुणवत्ता, कागद यांवर खर्च झालेला आहे, असं विनोद तावडे म्हणाले.
दरम्यान, किंमतीमध्ये जास्त वाढ केली नसल्याचा दावा बालभारतीचे संचालक डॉ. सुनील मगर यांनी केला. ''यावेळी सर्व पुस्तके ए 4 साइजची आहेत, शिवाय पानांची संख्या जास्त आहे. दोन श्रेणी पुस्तके यामध्ये अधिक आहेत. जवळपास 12 टक्के वाढ ही आपल्याला या नवीन अभ्यासक्रमाच्या पुस्तकाच्या किंमतीत पाहायला मिळेल,'' असं ते म्हणाले.
''ज्ञानावर आधारित प्रश्नपत्रिकांचं स्वरूप न ठेवता आकलनावरती आम्ही भर दिलेला आहे. प्रश्नपत्रिका कशा पद्धतीची असेल याची मूल्यमापन पुस्तिकाही बाजारात आणलेली आहे. विद्यार्थ्यांची विचारशक्ती कशी जागृत होईल, त्याची वाढ कशी होईल, याचा विचार करून या अभ्यासक्रमाचं स्वरूप तयार केलं गेलं,'' अशी माहिती मगर यांनी दिली.
या 5 तारखेपासून सर्व शिक्षकांचं या नवीन अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षण सुरु करणार असल्याची माहिती सुनील मगर यांनी दिली. 18 ते 19 एप्रिलपर्यंत हे प्रशिक्षण राज्यातील शिक्षकांना देण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं.
दहावीच्या नव्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकांचं प्रकाशन, किंमती मात्र वाढल्या!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Apr 2018 10:14 AM (IST)
यापुढे इयत्ता दहावीसाठी नवीन अभ्यासक्रम असणार आहे. दादरच्या शिवाजी मंदिरात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नवीन पुस्तकांचं प्रकाशन केलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -