नवी मुंबई : सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या हत्या प्रकरणी नवनवीन माहिती समोर येत आहे. हत्या केल्यानंतर चार आरोपींनी कशाप्रकारे पुरावे नष्ट केले, हे समोर आलं आहे.

अश्विनी बिद्रे यांची हत्या करुन त्यांचे धड आणि हात, पाय, मुंडके वेगळे करण्यात आले. अभय कुरुंदकर याने तुकडे केलेल्या हात, पाय आणि डोके यांची विल्हेवाट लावली. मात्र धड टाकण्यासाठी त्याने चौथा आरोपी महेश पळणीकर याची मदत घेतली.

लोखंडी पेटीत धड भरुन दोघांनी वसईच्या खाडीमध्ये टाकल्याची माहिती पळणीकर याने दिली. स्पॉटवर जाऊन बिद्रेंचा मृतदेह शोधण्यासाठी महेश पळणीकर याची 9 तारखेपर्यंत पोलिस कस्टडी घेण्यात आली आहे.

ज्या कटरने बॉडीचे तुकडे करण्यात आले, त्या कटरची विल्हेवाट कुंदन भंडारी याने लावली असल्यामुळे त्याचा तपास करण्यासाठी पाच तारखेपर्यंत पोलीस कस्टडी घेण्यात आली आहे.

बिद्रे यांच्या मृतदेहाचे तुकडे हे खाडीत फेकण्यापूर्वी अभय कुरुंदकरच्या भाईंदरच्या घरातील फ्रीजमध्ये ठेवल्याचं समजतं.

फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेटीव्ह टीमने भाईंदरमधील मुकुंद प्लाझा या इमारतीतील कुरुंदकरच्या घराची झाडाझडती घेतली. तसंच मृतदेहाचे तुकडे ज्या फ्रीजमध्ये ठेवले होते, तो फ्रीज आणि त्याखालील थर्माकॉलचा स्टॅण्ड पोलिसांनी ताब्यात घेतला.

नवी मुंबई पोलिसांनी आरोपी महेश पळणीकरला अटक केल्यानंतर त्याने बिद्रे यांची हत्या करुन, मृतदेहाचे तुकडे करुन, मृतदेह कुरंदकरांनी आपल्या फ्रीजमध्ये ठेवल्याची धक्कादायक कबुली दिली होती. त्यानंतर त्यांनी हा मृतदेह वसई येथील भाईंदरच्या खाडीत टाकल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली होती.

या प्रकरणी पोलिसांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर, राजू पाटील, चालक कुंदन भंडारी आणि मित्र महेश पळणीकर यांना अटक केली आहे. नवी मुंबई क्राईम ब्रँचकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

आतापर्यंत अश्विनी बिद्रे प्रकरणी फक्त अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र आता चौघा आरोपींविरोधात हत्या आणि पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 11 एप्रिल 2016 रोजी चौघा आरोपींनी एकत्र येऊन हत्या केल्याची माहिती आहे.

महेश पळणीकर हा अभय कुरुंदकरचा बालपणीचा मित्र असून तो कुरुंदकरचे सर्व व्यवहार करत असे. त्याला पुण्याच्या कात्रज परिसरातून अटक करण्यात आली होती.

डिसेंबरमध्ये अभय कुरुंदकर आणि राजेश पाटील यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर दोन महिन्यांनी तपास गुन्हे शाखेकडे देऊन तपास अधिकारी बदली झाल्यावर आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली.

या प्रकरणाचा तपास सुरुवातीला गुन्हे अन्वेषण शाखेकडे देण्याची मागणी अश्विनीच्या कुटुंबाने केली होती. परंतु नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी याची दखल घेतली नाही. मात्र नंतर याचा तपास गुन्हे शाखेकडे गेल्यावर इतर आरोपी समोर आले असल्याचा दावा अश्विनीचे पती राजू गोरे यांनी केला आहे.

नेमकं काय प्रकरण आहे?

15 एप्रिल 2016 पासून अश्विनी राजू गोरे या महिला पोलिस अधिकारी मुंबईतील कळंबोलीतून बेपत्ता झाल्या होत्या. त्या बेपत्ता झाल्या नसून त्यांचे वरिष्ठ पोलिस अधिकारी अभय कुरुंदकर यांनी त्यांना बेपत्ता केल्याचा आरोप कुटुंबाने केला. या तपासात पोलिस सहकार्य करत नसल्याचा आरोप अश्विनी यांच्या कुटुंबीयांनी केला होता.

कोल्हापूर जिल्ह्यातील आळते गावातील एक महत्त्वकांक्षी तरुणी अश्विनी जयकुमार बिद्रे 2000 सालापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होत्या. 2005 साली त्यांचा विवाह हातकणंगले गावातील तरुण राजू गोरे यांच्यासोबत झाला. लग्न झाल्यानंतर एकाच वर्षात अश्विनी स्पर्धा परीक्षा पास झाल्या आणि त्यांना पोलिस उपनिरिक्षक पद मिळालं.

पोलिस दलात रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग पुणे आणि त्यानंतर सांगली इथे झाली. यावेळी त्यांची ओळख त्याच पोलिस ठाण्यात असणाऱ्या वरिष्ठ पोलिस अधिकारी अभय कुरुंदकर यांच्यासोबत झाली. या दोघांमध्ये जवळीक वाढली होती. त्यानंतर 2013 साली अश्विनी गोरे यांना प्रमोशन मिळाल्याने त्या रत्नागिरीला रुजू झाल्या. इथेही अभय कुरुंदकर हे अश्विनीला भेटण्यासाठी वांरवार येत होते. हे सर्व प्रकरण अश्विनी यांचे पती आणि वडिलांना समजलं.

अश्विनी आणि अभय यांच्यात वाद

अभय कुरुंदकर आणि अश्विनीमध्ये सतत वाद होत होते. तेव्हा कुरुंदकरांनी अश्विनी यांना गायब करण्याच्या धमक्याही पतीला दिल्या होत्या. यामुळे अश्विनी यांचं कुटुंब व्यथित झालं होतं. या काळातच 2015 साली अश्विनी यांची बदली नवी मुंबईतील कळंबोली पोलिस ठाण्यात झाली. मात्र त्या हजर झाल्या नाहीत. त्या हजर का झाल्या नाहीत या आशयाचं पत्र पोलिस खात्यानेही पाठवलं. त्यावेळी अश्विनीच्या घरातील लोकांना त्या गायब झाल्याचं लक्षात आलं. त्यांनी कळंबोली पोलिसात याची तक्रार दाखल केली.

अश्विनी आणि अभय कुरुंदकर यांच्यातील वादाचे, प्रेमाचे सर्व संवाद अश्विनी यांनी आपल्या संगणकात रेकॉर्ड करुन ठेवले होते. अश्विनीच्या घरातील मंडळींनी जेव्हा संगणक पाहिला, त्यावेळी या गोष्टी उघड झाल्या. अभय कुरुंदरकांनी भांडणादरम्यान वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचं उघड झालं. हे सर्व पुरावे कळंबोली पोलिसांना देताच अभय करुंदकर हे तात्काळ रजेवर गेले.


संबंधित बातम्या


अश्विनी बिद्रे हत्या: आधी तुकडे केले, मग फ्रीजमध्ये ठेवले, नंतर खाडीत फेकले!


अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणाच्या तपासाला वेग, चौथा आरोपी अटकेत

बेपत्ता API बिद्रे प्रकरण : अभय कुरुंदकरच्या खासगी ड्रायव्हरला अटक

बेपत्ता API बिद्रे प्रकरण: वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर निलंबित

बेपत्ता API बिद्रे प्रकरण: कळंबोली, जळगाव आणि सांगलीतून धरपकड

घराला नवा रंग, कुरुंदकरांनी बिद्रेंचा घातपात केल्याचा संशय

अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण : पोलीस अधिकारी कुरुंदकर अटकेत

बेपत्ता पोलिस अश्विनी बिद्रेंना अभय कुरुंदकरांची मारहाण


एपीआय अश्विनी गोरे दीड वर्षांपासून बेपत्ता, वरिष्ठ अधिकाऱ्यावर संशय