नवी मुंबई : सलग दोन दिवस सुरु असलेला संप अखेर नवी मुंबईच्या सफाई कामगारांनी मागे घेतला. संप सुरू असल्याने शहरात सर्वत्र कचऱ्याचं साम्राज्य पसरलं आहे. समान काम - समान वेतनची मागणी करत कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता.


महापालिकेने सफाई कामगारांच्या मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिल्याने कामगार संघटनेने संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. दोन दिवस सुरू असलेल्या संपामुळे शहरातील नागरिकांना कचरा समस्येला सामोरं जावं लागलं.

यामुळे आमदार मंदा म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त डॉ. एन रामास्वामी आणि महापौर जयवंत सुतार यांची भेट घेत कामगारांच्या मागण्या मान्य करत संपावर लवकर तोडगा काढण्याची मागणी केली होती. आयुक्त, महपौर आणि कामगार नेत्यांच्या बैठकीत यावर तोडगा निघाला.

लवकरच समान काम-समान वेतन लागू करून गेल्या 27 महिन्यांच्या राहिलेला पगारातील फरक रक्कम देण्यात येणार आहे. त्यामुळे नवी मुंबईतील सफाई कामगारांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे.