मुंबईजवळ समुद्रात मालवाहू जहाज बुडालं, सर्व 16 कर्मचारी सुखरुप
एबीपी माझा वेब टीम | 21 Nov 2017 10:07 PM (IST)
इंजिनमध्ये पाणी शिरल्याने हे जहाज बुडालं.
मुंबई : शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं मालवाहू जहाज मुंबईजवळच्या समुद्रात बुडालं आहे. ओएनजीसी कंपनीसाठी काम करणाऱ्या या जहाजातील सर्व 16 कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आलं. इंजिनमध्ये पाणी शिरल्याने हे जहाज बुडालं. जहाज बुडायला सुरुवात झाली तेव्हाच बाजूने एक जहाज जात होतं. त्या जहाजातील कर्मचाऱ्यांना हे जहाज बुडताना दिसताच त्यांनी या जहाजावरील कर्मचाऱ्यांना वाचवलं. विशेष म्हणजे हे बुडालेलं जहाज केवळ पाच वर्षे जुनं आहे. सायंकाळी 5 वाजता इंजिनमध्ये पाणी भरायला सुरु झालं आणि रात्री 8 वाजता हे जहाज पूर्णपणे पाण्यात बुडालं. दरम्यान 16 कर्मचाऱ्यांना वाचवण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली.