मुंबई : नारायण राणे काँग्रेसच्या वाटेवर असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरु होत्या. मात्र या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. नारायण राणेंनी आगामी लोकसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची भूमिका स्पष्ट केली आहे.
नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष लोकसभेच्या रिंगणात उतरला आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या पाच जागा नारायण राणेंचा पक्ष लढवणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि नारायण राणे यांच्यात चर्चा झाली असून नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांसमोर स्वबळावर लढण्याची भूमिका स्पष्ट केली आहे.
नारायण राणेंचे पुत्र काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनीही आमची दिशा ठरल्याचं ट्वीट केलं होतं. "हे बरे आहे, राणे साहेब काँग्रेसमध्ये होते तेव्हा काँग्रेस नेत्यांनीच दिल्लीपासून गल्लीपर्यंत बोंब केली होती की, ते भाजपमध्ये जात आहेत. राणे साहेब काँग्रेस सोडून बाहेर आले, आता काँग्रेस नेतेच बोंब करतात की ते काँग्रेसमध्ये परत येत आहेत. मात्र आमची दिशा ठरली आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष!
मागील वर्षी नारायण राणे यांनी काँग्रेसची साथ सोडत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली होती. सध्या ते भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर खासदार आहेत. महाराष्ट्रात सेना-भाजपचं सरकार सत्तेत आहे. मात्र सेना आणि राणेंच फारसं पटत नाही.
नारायण राणे यांनी शिवसेनेतून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. शिवसेनेत असताना त्यांनी विविध पदे भूषविले होती. युती सरकारच्या काळात ते मुख्यमंत्री होते. मात्र नाराजीनंतर शिवसेनेला जय महाराष्ट्र करत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी आघाडी सरकारच्या कार्यकाळात विविध मंत्री पदे भूषवली. मात्र पक्षातील नेत्यांसोबत त्यांचं पटलं नाही आणि त्यांनी वेगळी वाट धरली.