कल्याण : काळ्या जादूसाठी मांडूळ सापाची तस्करी करण्यासाठी आलेल्या एका इसमाला उल्हासनगर गुन्हे शाखेनं अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल 10 लाख रुपये किंमतीचा मांडूळ जातीचा साप जप्त करण्यात आला आहे.


सोनू सोनावणे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून तो जळगाव जिल्ह्यातील रहिवाशी आहे. सोनू हा मांडूळ सापाची तस्करी करण्यासाठी उल्हासनगरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून सोनूला अटक करण्यात आली.


त्याच्याकडून चार फूट लांबीचा आणि एक किलो वजनाचा मांडूळ या दुर्मिळ जातीचा साप हस्तगत करण्यात आला आहे. या सापचा उपयोग काळ्या जादूसाठी करण्यात येत असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली किंमत तब्बल 10 लाख रुपयांच्या घरात आहे.


सोनूच्या विरोधात वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. उल्हासनगर गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.