मुंबई: महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी देऊ केली असली, तरी स्वत: राणे त्याबाबत इच्छुक नसल्याचं सांगण्यात येत आहे. सूत्रांनी याबाबतची माहिती दिली.


इतकंच नाही तर राणेंचे सुपुत्र आमदार नितेश राणे यांनीही तसं ट्विट करुन, राणेंनी महाराष्ट्रातच थांबावं, दिल्लीत जाऊ नये असं म्हटलं आहे.

त्यामुळे भाजप नारायण राणेंचं पुनर्वसन कुठे आणि कसं करणार याबाबतची चर्चा आता रंगू लागली आहे.

नितेश राणे यांचं ट्विट

दरम्यान, नारायण राणेंना भाजपने दिलेल्या ऑफरनंतर नितेश राणे यांनी ट्विट केलं.

“महाराष्ट्राच्या राजकारणात राणेसाहेबांची गरज आहे. अजून बराच काळ ते महाराष्ट्रातच रहावेत अशी आमच्यासारख्या हितचिंतकांची इच्छा आहे. आम्ही त्यांना विधानसभेत पाहू इच्छितो, राज्यसभेत नाही. आशा आहे ते समजून घेतील”, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.


मला भाजपकडून राज्यसभेची ऑफर: नारायण राणे

मला मंत्रिपद देण्याबाबत विलंब का होतोय, याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांना विचारा. मला त्याबाबत माहिती नाही. भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याशी दिल्लीत चर्चा झाली. मला भाजपकडून राज्यसभेची ऑफर आहे, अशी माहिती महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी दिली. ते एबीपी माझाशी बोलत होते.

राणे-अमित शाहांची भेट

भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या ११ अकबर रोड या दिल्लीतल्या निवासस्थानी बुधवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नारायण राणे यांच्यात जवळपास तासभर बैठक झाली.

या बैठकीला नितेश राणे, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचीही उपस्थिती होती. येत्या २३ मार्चला महाराष्ट्रातून राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक होणार आहे. विधानसभेतल्या संख्याबळानुसार भाजपला ३ उमेदवार राज्यसभेवर पाठवता येणार आहेत. त्यापैकी एक जागा राणेंना देऊन राणेंसारखं स्फोटक मिसाईल हे राज्याऐवजी दिल्लीतच पाठवण्याचा भाजपमध्ये प्रयत्न सुरु आहे.

संबंधित बातम्या

मला भाजपकडून राज्यसभेची ऑफर: नारायण राणे

नारायण राणे भाजपची खासदारकीची ऑफर मान्य करतील?

दिल्लीत राणे-फडणवीस एकत्र, मंत्रिपदावर निर्णयाची शक्यता

दिल्लीत अमित शाह, मुख्यमंत्री आणि राणेंची बैठक, मंत्रिपदावर खलबतं?