मंत्रिमंडळातील सहकारी! जानकर-रावलांना संबोधताना राणेंना घाई
एबीपी माझा वेब टीम | 09 Oct 2017 10:27 PM (IST)
भाषणाच्या सुरुवातीला मंचावर उपस्थित नेत्यांची नावं घेताना राणे यांनी मंत्री महादेव जानकर आणि जयकुमार रावल यांचा उल्लेख ‘मंत्रिमंडळातील आमचे सहकारी’असा केला.
मुंबई : नारायण राणेंनी स्वतंत्र पक्ष स्थापन केल्यानंतर एनडीएला पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात सहभागी होण्याची राणेंना काहीशी घाई झाल्याचं चित्र आहे. मंत्र्यांचा उल्लेख राणेंनी 'मंत्रिमंडळातील आमचे सहकारी' असा केल्यामुळे तटकरेंच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात हशा पिकला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या 30 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीवर आधारित समग्र या पुस्तकाचं प्रकाशन मुंबईतल्या रविंद्र नाट्य मंदिरात पार पडलं. भाषणाच्या सुरुवातीला मंचावर उपस्थित नेत्यांची नावं घेताना राणे यांनी मंत्री महादेव जानकर आणि जयकुमार रावल यांचा उल्लेख ‘मंत्रिमंडळातील आमचे सहकारी’असा केला. राणेंच्या वक्तव्यानंतर मंचावर असलेल्या सर्वच नेत्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं आणि सभागृहात हशा पिकला. राणेंचा पक्ष एनडीएत जाणार असून राणेंचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. पण त्याआधीच राणेंनी जानकर-रावल यांना सहकारी बनवून टाकलं आणि भाषणात उल्लेख केला.