मुंबई: ‘राज्यातल्या काँग्रेसच्या नेतृत्वात बदल केला नाही तर काँग्रेसची वाट लागेल’, अशा शब्दात नारायण राणेंनी अशोक चव्हाणांवर जोरदार टीका केली. ते ‘एबीपी माझा’च्या माझा विशेष या कार्यक्रमात बोलत होते.
‘मागील काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये मला प्रदेशाध्यक्ष करण्याबाबत चर्चा सुरु आहे. त्यामुळेच काही जणांनी मुद्दामहून मी पक्ष सोडणार असल्याचा बातम्या पसरवण्यास सुरुवात केली. माझी दिल्लीमध्ये असणारी इमेज खराब करण्यासाठी हा प्रयत्न असून शकतो.’ असंही राणे म्हणाले.
आपण काँग्रेसला सोडणार असल्याच्या बातम्या पसरवण्यात काँग्रेसमधील काही जणांचं षडयंत्र असल्याचा प्रहार राणेंनी केला. तसंच आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला डावललं जात असल्याची खंतही राणेंनी बोलून दाखवली.
‘पक्षांतराच्या बातम्या पेरण्यात काँग्रेसचाच हात’
“मी कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. कोणताही नेता मला भेटलेला नाही, तशी चर्चाही झालेली नाही. गेले 15 दिवस चर्चा सुरु आहे. मी कोणालाही न भेटता अशा बातम्या खात्री न करता पसरवणं चुकीचं आहे, त्यामुळे मीडियात येऊन स्वत: स्पष्टीकरण द्यावं म्हणून मी स्पष्टीकरणासाठी आलो,” असं राणे म्हणाले.
“मी काही कामानिमित्त मुख्यमंत्र्यांना भेटलो. त्यांना भेटलो म्हणजे भाजपात जातोय असं होत नाही. या बातम्या पेरण्यामागे काँगेसच्याच नेत्यांचा हात आहे. त्यांचंच षडयंत्र असल्याचं माझं मत आहे,” असा आरोपही नारायण राणे यांनी केला.
संबंधित बातम्या:
पक्षांतराच्या बातम्या पेरण्यात काँग्रेसचाच हात : राणे
नारायण राणे यांचा राजकीय प्रवास
नारायण राणे पुन्हा शिवसेनेत परतणार?