मुंबई: गारपिटीची नुकसान भरपाई मागणाऱ्या शेतकऱ्याला मंत्रालयात मारहाण झाल्याचं समोर येतं आहे. गारपिटीनं नुकसान झालेले रामेश्वर भुसारे नुकसान भरपाईसाठी मंत्रालयात आले होते. जोपर्यंत आपली मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत इथून जाणार नाही असं सांगत भुसारे यांनी तिथेच ठिय्या मांडला.
पण ते जात नाहीत असं पाहून तिथल्या सुरक्षा रक्षकानं लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप भुसारेंनी केला आहे.
याप्रकरणी कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर म्हणाले की, ‘संबंधित शेतकरी हा गांज्याची शेती करण्यासाठी परवानगी मागत होता.’
याप्रकरणी मंत्रालय सुरक्षा अधिकाऱ्यांच्या मते, त्या शेतकऱ्याला संबंधित अधिकारी-मंत्री यांची भेट घालून देण्यात आली होती. पण तरीही त्याचं समाधान न झाल्यानं त्यानं मंत्रालयातच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्याची समजूत घालण्याचाही प्रयत्न केला. पण तरीही त्याचा गोंधळ सुरुच होता. त्यानंतर मात्र, त्याला मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नेण्यात आलं.
दरम्यान, संपूर्ण प्रकरणाबाबत पोलीस उपायुक्त मनोज शर्मा यांनी माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘एक शेतकरी मंत्रालयात आला होता. मंत्रालय बंद होत असताना त्याला बाहेर जाण्यास सांगितलं. पण तो बाहेर जाण्यास तयार नव्हता. म्हणून पोलीस त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी तोच एका पोलिसाला चावला. सध्या जखमी पोलिसावर उपचार सुरु आहेत.’