मुंबई : दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव घेऊ नये अशी विनंती करणारे उद्धव ठाकरे यांचे आपल्याला दोन फोन आले होते असा दावा खासदार नारायण राणे यांनी केला. या प्रकरणात आपण सहकार्य करावं अशी विनंतीही उद्धव ठाकरे यांनी केल्याचा दावा नारायण राणे यांनी केला. या प्रकरणी आपण आदित्यचं नाव घेतलं नाही, पण तो संध्याकाळी कुठे जातो, ते पाहून जरा काळजी घेण्याची सूचना उद्धव ठाकरेंना आपण केल्याचा दावाही नारायण राणे यांनी केला. 


दिशा सालियन प्रकरणात तिच्या वडिलांनी पुन्हा एकदा नव्याने याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव असून उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांना दोन कॉल केल्याचा दावा नितेश राणे यांनी केला होता. त्यावर नारायण राणे यांनी त्या दोन कॉलमध्ये नेमकं काय संभाषण झालं याची माहिती दिली. 


Narayan Rane Uddhav Thackeray Call : पहिल्या कॉलमध्ये काय बोलले? 


नारायण राणे म्हणाले की, "ही जी घटना घडली होती त्यावेळी एक फोन आला. मिलिंद नार्वेकरांनी सांगितलं की उद्धव ठाकरे यांना बोलायचं आहे. सध्या आदित्यचं नाव घेता त्याचा उल्लेख करू नये अशी विनंती करतो असं ते म्हणाले. एका निरपराध मुलीची हत्या केली गेली त्यामध्ये आरोपींना शिक्षा मिळावी असं मी त्यांना म्हणालो. संध्याकाळी तुमची मुलं कुठे जातात त्याची काळजी घ्या. त्यावर ते म्हणाले की तशी काळजी घेतो पण तुम्ही सहकार्य करा."


दुसऱ्या कॉलवेळीही तिच विनंती


दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे यांचे नाव घेऊ नका अशी विनंती करणारा दुसरा कॉल आला असल्याचं नारायण राणे म्हणाले. ते म्हणाले की, "दुसरी फोन कोरोनाच्या काळात आला. त्यावेळी आपल्या हॉस्पिटलची परवानगी राज्य सरकारकडे होती. त्या संबंधित ती परवानगी मिळेल असं त्यांनी सांगितलं. त्यावेळी आदित्यचं नाव घेऊ नका अशी पुन्हा एकदा त्यांनी विनंती केली. तुम्ही जरा या प्रकरणात सहकार्य करा अशी विनंती त्यांनी केली."


किशोरी पेडणेकरांनी या प्रकरणात दिशाच्या आई वडिलांवर का दडपण आणलं असा प्रश्न नारायण राणे यांनी केला. 


सचिन वाझे-कोरटकरवर कारवाई का करत नाही? 


आपण फक्त एक वाक्य बोलल्यानंतर पोलिसांनी आपल्याला अटक केली होती. पण आता सचिन वाझे असेल वा प्रशांत कोरटकर, या प्रकरणात पोलिस का कारवाई करत नाहीत असा प्रश्न  नारायण राणे यांनी केला. दिशा सालियन प्रकरणात मुंबई पोलिस अजूनही कारवाई का करत नाहीत असा प्रश्नही त्यांनी विचारला. 


शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कोरटकरवर कारवाई का केली जात नाही, त्याला असेल तिथून शोधून काढलं पाहिजे असं नारायण राणे म्हणाले. 


अनिल परबांवर जोरदार टीका


अनिल परब आणि आक्रमकता याचा काही संबंध नाही असा टोला नारायण राणे यांनी लगावला. अनिल परब यांनी आतापर्यंत कुणाला कानफटीत तरी मारलंय का असा सवाल त्यांनी केला. चित्रा वाघच्या मागे नारायण राणे आणि पूर्ण भाजप असून अनिल परब सांगतील तिथे आपण जाऊ असंही नारायण राणे म्हणाले. 


 



ही बातमी वाचा: