मैत्रीचं नातं हे जगातलं सर्वात खास नातं असतं, हे कोणालाही वेगळं सांगायची गरज नाही. मैत्रीच्या नात्याशिवाय हे जीवन अपूर्ण आहे असं म्हटलं तर वावगं ठरु नये. याच मैत्रीदिनानिमित्त एबीपी माझाने खासदार नारायण राणेंशी संवाद साधला. राजकारणातल्या आणि खासगी आयुष्यातल्या मित्रांविषयी, मैत्रीविषयी अनेक प्रश्न विचारले. यावर राणेंनी खुमासदार उत्तरे दिली.


राजकारणी लोकांची तत्त्वं आणि नीतिनियम पूर्णत: भिन्न असतात. त्यांच्यातील मैत्र हे दीर्घकाळ टिकणारे नसते. याबाबत राणेंना काय वाटंत? त्यांचे मित्र कोण आहेत? खरी मैत्री आता राहिली नाही, असं राणेंना का वाटतं? याची उत्तरे राणेंनी या मुलाखतीत दिली.

1. तुमचे जवळचे मित्र कोण आहेत?
उत्तर : माझे नातू माझे मित्र आहेत. मी ऑफिसवरून घरी आलो की त्यांच्याबरोबर वेळ घालवतो. मी त्यांच्यासोबत क्रिकेटसह विविध खेळ खेळतो.

2. नातवांसोबत लपाछपी कशी खेळता?
उत्तर : राजकारणात खेळतो तशी खेळत नाही, मी लपायचा प्रयत्न करतो, पण हे दोघे (दोन नातू) नेहमी मला पकडतात.

3. नातवांना फिरायला कुठे घेऊन जाता?
उत्तर : नातवांना आत्ताच लंडनला फिरायला घेऊन गेलो होतो. दोघांनीही खुप मजा केली

4. राजकारणातले मित्र कोण आहेत?
उत्तर : राजकारणाच्या पलिकडे माझे जुने मित्र आहेत. आम्ही घरी येत जात असतो. जे खरे मित्र आहेत, ते सध्याच्या राजकारणात दिसत नाहीत.

5. राजकारणात मैत्रीचा अभाव का आहे?
उत्तर : मैत्रीमध्ये प्रामाणिकपणा राहिला नाही, दगाफटका केला जातोय, दिलेला शब्द पाळला जात नाही. मैत्री हा केवळ शब्द राहिलाय, पण त्याचा अर्थ राहिला नाही. जुन्या नेत्यांच्या मैत्रीचे किस्से आजही ऐकायला मिळतात. परंतु पूर्वीसारख्या नेत्यांच्या जोड्या आता कमी राहिल्या आहेत. एकमेकांची विकेट काढणे हा प्रकार मैत्रीमध्ये वाढत आहे. परिस्थितीनुसार सगळं बदलत गेलंय.

6. नारायण राणेंचा खरा मित्र कोण?
उत्तर : मी सर्वांसोबत मैत्री करतो, मैत्रीचं नातं जोपासतो. माझ्याकडून जेवढं टिकवायचं तेवढं टिकवतो. पण मला मात्र मैत्रीचा प्रतिसाद इतरांकडून मिळाला नाही, हे दुर्देवानं सागावं लागतंय.

7. उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाणांसोबत मैत्री आहे का?
उत्तर : मैत्री होती, मित्रासारखं वातावरण होतं कुटुंबासह एकत्र जेवण व्हायचं, पण आता तसं राहिलं नाही. अशोक चव्हाण हे मित्र जरी नसले तरी सहकारी होते, पक्षाचे प्रमुख होते. राजकारणापलिकडे माझं त्यांच्यासोबत वैमनस्य नव्हतं

नारायण राणेंची संपूर्ण मुलाखत पाहा



8. शिवसेना, काँग्रेस ते भाजप सर्वात जास्त मित्र कुठे मिळाले?
उत्तर : सर्वात जास्त वेळ शिवसेनेत गेला, त्यामुळे शिवसेनेत सर्वात जास्त मित्र मिळाले. आजही शिवसेनेतल्या लोकांसोबत चांगले संबंध आहेत.

9. कुठले मित्र आवडतात? घरातले की राजकारणातले?
उत्तर : घरातले. यांना पाहिलं की सर्व तणाव दूर होतो. हे निर्मळ मनाचे मित्र आहेत.




राणेंना विचारलेले रॅपिड फायर प्रश्न

A. फ्रेन्डशिप बॅन्ड बांधायचा झाला तर कोणाला बांधाल? उद्धव ठाकरे की अशोक चव्हाण?
उत्तर : अशोक चव्हाण

B. चित्रपट किंवा नाटकाला कोणासोबत जायला आवडेल? राज ठाकरे की शरद पवार?
उत्तर : राज ठाकरेंसोबत चित्रपट पाहायला आवडेल, शरद पवार ज्येष्ठ आहेत, त्यामुळे त्यांच्यासोबत एखादं नाटक पाहायला आवडेल.

B. लंच किंवा डिनरला कोणासोबत जायला आवडेल ? देवेंद्र फडणवीस की नितिन गडकरी?
उत्तर : देवेंद्र फडणवीस

D. राजकारणातलं आवडतं कुटुंब कोणतं? ठाकरे की गांधी?
उत्तर : ठाकरे कुटुंब