मुंबई : मुंबई, पुणे, नवी मुंबई, नाशिक, अहमदनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरीमध्ये उद्या (सोमवार, 5 ऑगस्ट) शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता उद्या पालघर, ठाणे, रायगड, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील शाळा व काॅलेजना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनाही पोहोचण्यास विलंब झाल्यास उशीरा येण्याची सवलत देण्यात आली आहे.
पुण्यातही पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. अनेक नद्यांनी पूर आला आहे. अनेक ठिकाणी लोकवस्तीत पाणी शिरलं आहे. त्यामुळे पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनीही पुणे जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. ठाणे आणि पुणेसोबत नाशिक, नवी मुंबईमध्येही शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आली आहे.
नाशिक शहर व ग्रामीण भागात तसेच इगतपुरी, त्रंबकेश्वर भागात जोरदार पाऊस झाल्याने गंगापूर व दारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने शनिवार सकाळपासून चांदोरीसह सायखेड्यात पूर पाणी गावात शिरायला सुरुवात झाली. ही पाणी पातळी क्षणाक्षणाला वाढत आहे. यामुळे हजारो पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. दुकाने व घरांमध्ये पाण्याचा शिरकाव सुरू झाला आहे.