खोटं बोलणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : राणे
एबीपी माझा वेब टीम | 18 Oct 2016 04:25 PM (IST)
मुंबई: "मराठा आरक्षणाबाबत सरकारने कोर्टात वेळ मागितला, मात्र मुख्यमंत्री म्हणाले की वेळ मागितला नाही. पण कोर्टाच्या आदेशाच्या प्रतमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटं बोलत असल्याचं उघड होत आहे. कोर्ट ऑर्डरमध्ये सरकारला वेळ हवा आहे असे स्पष्ट नमूद आहे. त्यामुळे खोटं बोलणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा", अशी मागणी काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केली. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी मराठा आरक्षणावरुन मुख्यमंत्री आणि भाजपवर हल्लाबोल केला. इतकंच नाही तर खोटं बोलणाऱ्या मुख्यमंत्र्यांविरोधात येत्या अधिवेशनात हक्कभंग आणि अविश्वासाचा ठराव मांडणार असल्याचं राणे म्हणाले. याशिवाय भाजप सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच नाही, सरकारच्या मनात आरक्षण देण्याची इच्छाशक्तीच नाही, असा आरोप राणेंनी केला. मुख्यमंत्र्यांकडून मराठा समाजाची दिशाभूल मराठा आरक्षणावरुन मुख्यमंत्री संभ्रम निर्माण करत आहेत. सरकार खोटं बोलतंय, मराठा समाजाची दिशाभूल, चेष्टा सुरु आहे. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला फसवलं आहे. त्यामुळे या सर्वाला जबाबदार असलेल्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी नारायण राणे यांनी केली. सरकार दोन वर्षांपासून शांत का? मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असतं, तर सरकारने नोव्हेंबर 2014 पासून आजपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर का केलं नाही? असा सवाल नारायण राणेंनी केला. मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार खोटं बोलून मराठा समाजाची दिशाभूल करणाऱ्या मुख्यमंत्र्यांविरोधात, येत्या अधिवेशनात हक्कभंग आणि अविश्वासाचा ठराव आणणार असल्याचं राणे म्हणाले. तसंच हे सरकार 14 भ्रष्टाचारी मंत्री घेऊन चालवलं जात असल्याचा आरोपही राणेंनी केला. नाशिकमधील अशांततेला पालकमंत्री जबाबदार तळेगाव अत्याचारानंतर उद्रेक झालेल्या नाशिकमधील अशांततेला पालकमंत्री गिरीश महाजनच जबाबदार असल्याचा दावा, राणेंनी केला. बडोले, जानकर, सदाभाऊ वाचाळवीर या मंत्रिमंडळातील राजकुमार बडोले, महादेव जानकर, सदाभाऊ खोत यासारखे मंत्री वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. त्यांच्या वक्तव्यांमुळेच समाजात तेढ निर्माण होत असल्याचा आरोपही नारायण राणेेंनी केला.