मुंबई : खोट्या नोटा देऊन फसवणूक करण्याचा प्रकार अनेक वेळा ऐकायला मिळतो. या नोटा बहुतांश वेळा पाचशे किंवा एक हजार रुपयांच्या असतात. मात्र मुंबईतील एका अभिनेत्रीची चक्क 100 रुपयांची खोटी नोट देऊन फसवणूक करण्यात आली आहे. रिक्षावाल्याने 'मोनोपॉली' खेळातली नोट देऊन मेघा चक्रवर्तीला गंडवलं. हुबेहुब बनवण्यात आलेल्या नोटांमुळे काहीवेळा ग्राहकांची फसगत होते. मात्र टीव्ही अभिनेत्री मेघा चक्रवर्तीला 'चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया' असं लिहिलेली शंभर रुपयांची नोट रिक्षावाल्याने दिली. रात्री एक वाजता मेघाने ही नोट घेतली. अंधारात हा प्रकार लक्षात न आल्याने घरी गेल्यावर तिला आपली फसवणूक झाल्याचं समजलं. मूळ कोलकात्याच्या असलेल्या मेघाने हा प्रकार फेसबुकवर शेअर केला आहे. मात्र तिच्या मित्र-मैत्रिणी आणि चाहत्यांनी मेघावरच तोंडसुख घेतलं आहे. 'तुझीच चूक आहे, अशी कशी मूर्ख बनलीस' अशा कमेंट्स करत मेघालाच वेड्यात काढलं गेलं आहे. आरबीआय गव्हर्नर ऐवजी सांताक्लॉजची सही असलेली नोट मेघाच्या हातात देण्यात आली. शंभर रुपये कूपन असं लिहिलेल्या या खेळातल्या नोटा वांद्रा पूर्वेकडच्या स्कायवॉकवर मोठ्या प्रमाणात आढळल्याचंही सांगितलं जात आहे. मेघाने शेअर केलेला हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. 10 हजारांहून जास्त लाईक्स आणि दोन हजारांपेक्षा जास्त वेळा फेसबुक शेअर असलेल्या फोटोतून मात्र मेघाचीच खिल्ली उडवली जात आहे.