मुंबई: जर माझे आई-वडील माझी फी भरण्यासाठी सक्षम असतील, तर मी सवलतीचा फायदा का घ्यावा, असा सवाल करत, एका विद्यार्थिनीने 'गिव इट अप गर्ल्स कन्सेशन' असं आवाहन केलं आहे. ऊर्जा भारतीय असं या विद्यार्थिनीचं नाव असून, ती रुईया महाविद्यालयात अकरावीत शिकते. ऊर्जाने याबाबत थेट शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनाच पत्र लिहिलं आहे. मुंबईसारख्या महानगरात जिथं आईवडिल दोघेही कमावते असतात, लाखो रुपये भरुन मुलांना क्लासेसना पाठवतात, तरीही महाविद्यालयात मात्र सवलतीचा फायदा का घ्यावा? .सवलत त्यांनाच मिळावी, ज्यांना गरज आहे आणि ज्यांना गरज नाही त्यांनी स्वतःहून सवलत नाकारायला हवी असं ऊर्जाचं मत आहे. अकरावीला रुईया महाविद्यालयात कला( Arts) साठी प्रवेश घेताना, मुलांना 500 रुपये आणि मुलींना 250 रुपये फी आहे. आपले आई -वडील पाचशे रुपये फी भरू शकतात, तर फी सवलत का घ्यायची असा प्रश्न तिला पडला आणि तिने रुईया महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांना आणि शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहिलं. मुलींना मिळणाऱ्या फी सवलतीविरोधात मी नाही. मात्र गरजू मुलांनाच ती सवलत मिळावी म्हणून ही फी सवलत नाकारत असल्याचं ऊर्जा सांगते. ऊर्जाने आपल्या इतर मित्र- मैत्रिणी,कुटुंबातील भावंडानाही फी देऊ शकत असाल, तर सवलत नाकारा, असं आवाहन केलं आहे. आज शहरात मुलं मॅक्डोनल्ड सारख्या ठिकाणी एका फटक्यात 200-300 रुपये उडवतात, तर कॉलेजची पूर्ण का फी भरू नये असा प्रश्न ऊर्जाला पडलाय.