मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी साल 2005 मध्ये शिवसेना सोडल्यानंतर सामना कार्यालयासमोर सभा सुरू असताना घातलेल्या गोंधळाप्रकरणातील खटल्यात अखेर मंगळवारी आरोपनिश्चित करण्यात आले. यानिमित्तानं मुंबई सत्र न्यायालयात उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट तसेच मनसेसह एकूण 38 नेत्यांनी आपली हजेरी लावली होती. सर्व आरोपींनी आपल्यावरील आरोप एकसुरात अमान्य असल्याचं सांगितलं. तेव्हा विशेष कोर्टाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी 'चला निदान याबाबत तरी तुमच्यात एकमत आहे' अशी मिश्कील टिप्पणी करताच कोर्टात सर्वजण एकत्र हसताना पाहायला मिळाले.


कसं होतं कोर्टातलं वातावरण?


या खटल्यानिमित्त मुंबई सत्र न्यायालयातील 54 नंबरच्या विशेष कोर्टात आज एक छान दृश्य पाहायला मिळालं. एकेकाळी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे मात्र आज एकमेकांकडे पाठ फिरवलेले कट्टर शिवसैनिक एकत्र बसलेले पाहायला मिळाले. अनिल परब आणि यशवंत जाधव यात सतत काहितरी कानगोष्टी सुरू होत्या. तर किरण पावसकर आणि विशाखा राऊत यांच्यात चक्क गप्पा रंगलेल्या पाहायला मिळाल्या. श्रद्धा जाधव या रूग्णालयातून कोर्टात येत असल्यानं त्यांच्यासाठी कोर्टानं दीड तास हे प्रकरण मागे ठेवलं होतं. तर जेष्ठ शिवसैनिक दगडू सकपाळ यांचा सर्वांनीच आदर केला. किरण पावसकर यांनी भर कोर्टात पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले. शिदे आणि ठाकरे गटाचे दोन प्रवक्ते किरण पावसरक आणि अनिल परब यांनी मात्र अखेरपर्यंत एकमेकांकडे पाहणं कटाक्षानं टाळलं. इतकी सारी लोकं आणि त्यांच्याबरोबर आलेले कार्यकर्ते यामुळे आज कोर्टात पाय ठेवायलाही जागा नव्हती.


38 जणांवर आरोपनिश्चिती


साल 2005 मध्ये नारायण राणे यांची सामना कार्यालयाबाहेरील सभा उधळल्या प्रकरणी तब्बल 18 वर्षानंतर 38 आरोपींवर दोषारोप निश्चित झाले. या खटल्यात विद्यमान 3 खासदार आणि 4 आमदार आरोपी आहेत. याप्रकरणी 47 जणांवर दादर पोलीस ठाण्यात 5 गुन्हे दाखल आहेत. गेल्या 18 वर्षांत यातील 5 आरोपींचा मृत्यू झालाय तर संजय बावके, रवींद्र चव्हाण, हरिश्चंद्र सोलकर आणि श्रीधर सावंत हे चार आरोपी कोर्टात येऊ शकले नाहीत. तर यातील 3 आरोपी कोण हे कुणालाच माहिती नसल्याची बाब आजच्या सुनावणीत समोर आली. न्यायाधीश राहुल रोकडे यांनी पोलिसांना याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे यावर काहीत उत्तर नव्हतं. तेव्हा न्यायाधीशांनी अनिल परबांकडे याबाबत विचारणा केली असता, त्यांनी या तिघांना आमच्यापैकी कुणीच ओळखत नसल्यानं त्यांना वगळून इतरांवरील कारवाई सुरू करण्याची विनंती कोर्टाकडे केली. तेव्हा कोर्टानं आपले विशेष अधिकार वापरत या तिघांवर नंतर स्वतंत्र खटला चालवण्याचं निश्चित करत कारवाई सुरू केली. त्यामुळे एकूण 38 आरोपींविरोधात दोषारोप निश्चित करण्यात आले.


न्यायाधीश राहुल रोकडे यांनी मग कोर्टात दोषारोपांचं वाचन केल्यानंतर सर्व आरोपींनी एकमूखानं सारे आरोप फेटाळून लावले.
या सर्वांवर आयपीसी कलम 141,143,145,147,149,319,353 यासह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 नुसार आरोप निश्चित करण्यात आलेत. तर आरोपनिश्चितीला गैरहजर राहिलेल्या संजय बावके, रवींद्र चव्हाण आणी हरिश्चंद्र सोलकर या तिघांविरोधात कोर्टानं अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. तर श्रीधर सावंत हे रुग्णालयात दाखल असल्यानं त्यांना कोर्टासमोर दाखल होण्यासाठी मुदत देण्यात आली.


काय आहे प्रकरण? 


18 वर्षांपूर्वी मतभेदामुळे नारायण राणे यांनी शिवसेना सोडली होती. त्यानंतर त्यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामना कार्यालयाबाहेर जाहीर सभा आयोजित केली होती. राणे यांनी पक्ष सोडल्याच्या निषेधार्थ तिथं शिवसैनिक मोठ्या संख्येने तेथे जमले होते. शिवसैनिकांनी राणेंच्या सभेत गोंधळ घालण्याचा आणि ती सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांना जमावावर लाठीचार्जही करावा लागला होता. त्यात अनेकजण गंभीररित्या जखमी झाले होते. तेव्हा, शिवसेनेत असलेले सध्या शिंदे गटाचे सदा सरवणकर, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, ठाकरे गटाचे अनिल परब यांच्यासह 47 जणांवर दादर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. 


ही बातमी वाचा :