पुणे: भीमा कोरेगाव प्रकरणी (Bhima Koregaon Violence) माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साक्ष तपासण्याची परवानगी द्या, अशी मागणी करणारं पत्र वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भीमा कोरेगाव चौकशी आयोगाला पाठवलं आहे. त्याचवेळी माजी मुख्य सचिव सुमित मलिक आणि पुण्याचे माजी पोलीस अधीक्षक सुवेज हक यांचीही विटनेस बॉक्समध्ये साक्ष तपासायची असल्याचं आंबेडकरांनी नमूद केलंय. प्रकाश आंबेडकरांना 5 जून साक्ष नोंदवण्यासाठी आयोगानं बोलावलं होतं. त्या पत्राला उत्तर देताना आपण 5 जूनला पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे येऊ शकत नसल्याचं कळवलंय.
कोरेगाव भीमा येथे जानेवारी 2018 साली दंगल झाली आणि त्यानंतर याप्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या भीमा कोरेगाव चौकशी आयोगासमोर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना साक्ष देण्यासाठी बोलावण्यात आलं होतं. आतापर्यंत शरद पवार, विश्वास नांगरे पाटील यांनी आपली साक्ष नोंदवली आहे.
नुकतेच या आयोगाच्या वतीने प्रकाश आंबेडकर यांना देखील साक्ष नोंदवण्यासाठी बोलावण्यात आलं होतं. परंतु प्रकाश आंबेडकर यांनी पूर्वनियोजीत कार्यक्रमांमुळे येणं सध्या शक्य नसल्याचं कळवलं. महत्त्वाची बाब म्हणजे माझी साक्ष नोंदवण्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि पोलीस अधीक्षक यांची साक्ष नोंदवण्याची आयोगाच्या सचिवांकडे परवानगी मागितली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी पत्रात काय म्हंटलं आहे?
प्रति,
मा. सचिव,
भीमा कोरेगाव चौकशी आयोग,
आपण याआधी देखील मला अनेक पत्र पाठवली आहेत. मी याआधी आपल्याकडे मागणी केली होती की, माझी साक्ष घेण्याआधी आपण मला महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्य सचिव सुमित मल्लिक, माजी पोलीस अधीक्षक सुवेज हक यांना विट्नेस बाॅक्समध्ये बोलावून त्यांची साक्ष तपासायची आहे, त्याप्रमाणे व्यवस्था करण्यात यावी.
कोरेगाव भीमा प्रकरणात प्रकाश आंबेडकर यांनी अशी मागणी का केली असावी याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलणं होऊ शकलं नाही. मात्र 'एबीपी माझा'ला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार प्रकाश आंबेडकर यांना काही प्रश्नांची उत्तरं या तिघांकडून ऐकायची आहेत.
काय आहेत प्रश्न?
1) तत्कालीन मुख्यमंत्री, माजी मुख्यसचिव आणि पोलीस अधिक्षक यांना सदर घटनेची माहिती कधी मिळाली?
2) केवळ कोरेगाव भीमापासून 40 किलोमीटर दूर असलेल्या मुख्यमंत्र्यांना घटनेची माहिती उशीरा मिळाली का?
3) जर घटनेची माहिती तत्काळ मिळाली असेल तर मुख्यमंत्र्यांनी घटनेची माहिती नसल्याचं माध्यमांशी बोलताना कसं काय म्हटलं?
4) मुख्यमंत्र्यांना सदर घटनेपासून अंधारात तर ठेवण्यात आलं नव्हतं ना?
प्रकाश आंबेडकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांची साक्ष नोंदवण्याची मागणी करुन तत्कालीन सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे खरंच आंबेडकरांची मागणी करुन आयोग तत्कालीन मुख्यमंत्र्यांसह अधिकाऱ्यांची साक्ष नोंदवण्याची परवानगी देणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे.