Mumbai Crime : मुंबई पूर्व उपनगरातील विक्रोळीमधून (Vikhroli) धक्कादायक घटना समोर आली आहे. कन्नमवारनगरमध्ये (Kannamwar Nagar) 22 वर्षीय तरुण घरातील सीलिंग फॅनला लटकलेल्या अवस्थेत आढळला तर त्याच्या आईचा मृतदेह बेडरुममध्ये सापडला. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करत पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे. ही घटना 4 जून रोजी समोर आली होती.


विक्रोळी पोलिसांच्या माहितीनुसार, कन्नमवारनगरमधील गुलमोहर सोसायटीच्या बी विंगमधील रुम नंबर 203 मध्ये दोन जण मृतावस्थेत सापडले. महिलेचा पती रविवारी (4 जून) त्यांना भेटण्यासाठी आला होता. परंतु दरवाजाची बेल वाजवूनही कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने संजय तावडे यांनी पोलिसात धाव घेतली. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. इथे पोहोचल्यानंतर दरवाजा तोडून पोलिसांनी घरात प्रवेश केला. यावेळी मुलाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला तर त्याच्या आईचा मृतदेह बेडरुममध्ये सापडला. उमा संजय तावडे (वय 54 वर्षे) आणि अभिषेक संजय तावडे (वय 22 वर्षे) अशी मृतांची नावं आहेत. पोलिसांनी दोघांचे मृतदेह राजावाडी रुग्णालयात पाठवले.


बराच वेळ दरवाजा उघडत नसल्याने पतीला संशय आला
 
उमा तावडे या मुलगा अभिषेकसोबत कन्नमवारनगरमधील गुलमोहर सोसायटीमध्ये राहत होता. रविवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास उमा यांचे पती संजय तावडे भेटायला आले. बराच वेळ दरवाजा वाजवून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना शंका आली आणि त्यांनी विक्रोळी पोलीस स्टेशनला धाव घेतली आणि परिस्थितीची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी अग्निशमन दलाला कळवल्यानंतर ते देखील घटनास्थळी पोहोचले. दरवाजा बंद असल्याचं समजल्यानंतर अग्निशमन दलाने तो तोडला आणि घरात प्रवेश केला.


आम्ही घरात प्रवेश केल्यानंतर तिथे एक सिंगल बेड होता, त्यावर उमा पडल्या होत्या आणि त्यांच्या तोंडातून फेस येत होते. तर अभिषेक सीलिंग फॅनला लटकलेल्या अवस्थेत दिसता. दोघांना राजावाडी रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं, असं पोलिसांनी सांगितलं.


अभिषेकचा मृत्यू श्वास गुदमरल्यामुळे झाल्याचं सोमवारी झालेल्या शवविच्छेदन अहवालात उघड झालं आहे. तर त्याच्या आईच्या मृत्यूचं कारण अद्याप प्रलंबित आहे. मात्र, मृतदेह अर्धवट कुजलेले असून त्यांचा मृत्यू 24 ते 48 तासांपूर्वी झाल्याचं समजतं. मृत्यूचे नेमकं कारण शोधण्यासाठी डॉक्टरांनी व्हिसेराचे नमुने घेतले आहेत.


प्राथमिक तपासात कोणती माहिती समोर?


प्राथमिक तपासानुसार, उमा तावडे या जवळच्या क्लिनिकमध्ये कम्पाऊंडर म्हणून काम करत होत्या, तर अभिषेक क्वचितच घरातून बाहेर पडत असे आणि शेजाऱ्यांनी त्याला क्वचितच पाहिलं होतं. उमा तावडे यांचा पती धारावीत राहतो आणि पत्नी आणि मुलाला भेटायला येत असेल. ते वेगळे का राहत होते याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. शेजाऱ्यांनी सांगितलं की त्यांनी तावडे यांच्या फ्लॅटमधून कधीही वाद किंवा भांडणाचे आवाज ऐकले नाहीत. 


पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे. शिवाय उमा यांच्या पतीने या घटनेबाबत कोणताही संशय व्यक्त केलेला नाही, अशी माहिती विक्रोळी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षक शुभदा चव्हाण यांनी दिली. त्यामुळे मायलेकाने आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली हे तपासाअंतीच स्पष्ट होईल.