Mumbai Cricket Association Elections मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदाची (MCA) निवडणूक चर्चेचा विषय बनली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे (Amol Kale) यांचं नुकतंच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यामुळे अध्यक्षपदाची जागा रिक्त असून त्यासाठी 23 जुलै रोजी निवडणूक पार पडणार आहे. अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या एमसीएच्या निवडणुकीत शरद पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि आशिष शेलार यांच्याकडून ‘फिल्डिंग’ लावली जात आहे.


आज मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे नेते नाना पटोले (Nana Patole), शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक (Vihang Sarnaik) आणि सध्या एमसीएचे सचिवपदी कार्यरत असणारे अजिंक्य नाईक (Ajinkya Naik) यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे एमसीएच्या अध्यक्षपदाची निवडणूक आता चुरशीची झाली आहे. यामध्ये कोण बाजी मारणार हे आगामी दिवसात दिसून येईल. 


अर्ज दाखल केल्यानंतर नाना पटोले काय म्हणाले?


मला आधीपासूनच क्रिकेटमध्ये आवड आहे. त्यात ही निवडणूक लागली, त्यामुळे हा निवडणूक लढण्याचा निर्णय मी घेतला आहे. या निवडणुकीसाठी जी काही रणनीती लागते, त्यानुसार आमच्याकडे निवडून येण्यासाठी पुरेसे मत आहे. त्यामुळे ही निवडणूक आम्ही जिंकू, असं नाना पटोले यांनी सांगितले.


अजिंक्य नाईक काय म्हणाले?


हा अर्ज भरताना आनंद नाहीय, अमोलसारखा मित्र गमावलाय. अमोलनं मुंबई क्रिकेटला ज्या उंचीवर नेऊन ठेवलंय, ती उंची अजून वाढवायची आहे. 15 महिन्यांसाठी आपल्यातलाच कुणीतरी असावा अशी सर्वांची इच्छा होती, म्हणून फॉर्म भरलाय.


मुंबई क्रिकेट असोशिएशनं महत्त्व काय? 


मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच, एमसीएला पूर्वी बॉम्बे क्रिकेट असोसिएशन म्हणून ओळखलं जायचं. ही मुंबई आणि त्याच्या आसपासच्या ठाणे आणि नवी मुंबईसारख्या क्रिकेटची प्रशासकीय संस्था आहे. एमसीएच्या कार्यक्षेत्रात पश्चिम उपनगरामधील डहाणू, मध्य उपनगरातील बदलापूर आणि खारघर तसेच नवी मुंबईचा समावेश आहे.एमसीए मुंबई क्रिकेट संघाचंही संचालन करते आणि मुंबई जिल्ह्यात क्रिकेट स्पर्धा आयोजित करते. एमसीचा मुंबई संघ भारताच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वात प्रबळ संघ म्हणून ओळखला जातो. मुंबई क्रिकेट संघानं विक्रमी 41 वेळा रणजी ट्रॉफी जिंकली आहे. विजय मर्चंट, सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर यांसारखे टीम इंडियाचे दिग्गज खेळाडूही एमसीएच्या संघाकडून खेळले आहेत. मुंबईचा संघ ऐतिहासिकदृष्ट्या बॅटिंग पॉवरहाऊस म्हणून ओळखला जातो. 


एमसीए एक महत्त्वाची क्रिकेट संघटना-


मुंबई क्रिकेट असोशिएशनची स्थापना 1930 मध्ये बॉम्बे क्रिकेट असोसिएशन म्हणून झाली. बॉम्बेचं मुंबई असे नामकरण झाल्यानंतर नाव बदलण्यात आलं. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रदेशात क्रिकेटचं संचालन करणाऱ्या संस्थांपैकी एमसीए एक महत्त्वाची क्रिकेट संघटना आहे. एमसीए व्यतिरिक्त विदर्भ क्रिकेट असोसिएशन आहे, जी विदर्भातील प्रदेशावर नियंत्रण ठेवते आणि उर्वरित महाराष्ट्रातील क्रिकेटचे संचालन करणारी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ही संस्था आहे.