मुंबई: पत्ता विचारण्याच्या बहाण्याने छेडछाड करणाऱ्या नराधमाच्या तावडीतून सुटण्यासाठी, एका अल्पवयीन मुलीने टेरेसवरुन उडी मारली. मुंबईजवळच्या नालासोपाऱ्यात ही धक्कादायक घटना घडली.


उंचावरुन उडी मारल्यामुळे 12 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिच्या कंबरेचं हाड फ्रॅक्चर झालं आहे. सध्या तिला मुंबईतील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

नालासोपारा पूर्व येथील अलकापुरी परिसरात मंगळवारी 3 एप्रिलला ही धक्कादायक घटना घडली. ही थरारक घटना कॅमेरात कैद झाली आहे.

35 वर्षीय इसम या मुलीला पत्ता विचारण्यासाठी आला. मुलीनं इमारतीचा पत्ता सांगितल्यावर, त्याने तिला जबरदस्तीनं टेरेसवर न्यायाला सुरुवात केली आणि तिथे अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली.

या प्रकाराने भेदरलेल्या मुलीनं स्वत:ची सुटका करण्यासाठी, थेट टेरेसवरुनच खाली उडी मारली.

त्यावेळी खाली उभ्या असलेल्या लोकांना याचा अंदाज आल्याक्षणी, त्यांनी तिला चादरीमध्ये झेलण्याचा प्रयत्न केला. मात्र या झटापटीत तिला गंभीर दुखापत झाली. पण सुदैवाने तिचा जीव वाचला आहे.

छेडछाड करणारा इसम मात्र पसार झाला आहे. सध्या पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.