मुंबई: स्थापना दिनानिमित्त भाजपने मुंबईत महामेळाव्याचं आयोजन केलं आहे. मात्र या कार्यक्रमामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना मोठा मनस्ताप होत आहे.

पश्चिम द्रूतगती मार्गावर कालपासून मोठी वाहतूक कोंडी होत आहे. काल अमित शाहांच्या स्वागतासाठी भाजपने सांताक्रूझ विमानतळ ते बीकेसीपर्यंत बाईक रॅली काढली होती. मात्र यामुळे तब्बल 4 ते 5 तास वाहतूक रखडली होती.

आजही भाजप कार्यकर्त्यांना घेऊन अनेक बसेस येत आहेत. मात्र यामुळे मोठी वाहतूक कोंडी होत आहे.

भाजपच्या बस रोखल्या

भाजपच्या बाईक रॅलीमुळे काल मुंबईकरांना मोठा मनस्ताप झाला. आजही तोच प्रकार पाहायला मिळत असल्याने, मुंबईकरांचा आज उद्रेक पाहायला मिळाला.

वांद्रे टर्मिनसहून बीकेसीकडे जाण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांना बस मिळते. पण सामान्य मुंबईकरांना बस मिळत नाही. त्यामुळे संतापलेल्या मुंबईकरांनी बीकेसीकडे जाणारी भाजप कार्यकर्त्यांची बस अडवली.

वाहतूक कोंडी

  • वांद्रे टर्मिनस ते बीकेसी रस्ता पूर्णत: ठप्प

  • वांद्रे टर्मिनस परिसरात प्रवाशांची मोठी गर्दी

  • वांद्र्याहून दक्षिण मुंबईकडे जाणारी वाहतूक रखडली

  • बीकेसीचा परिसर खचाखच, ट्रॅफिकमुळे मुंबईकरांना मनस्ताप


भाजपचा स्थापना दिवस

भारतीय जनता पक्षाच्या ३८ व्या स्थापना दिनानिमित्त आज मुंबईत भव्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. एमएमआरडीएच्या मैदानावर हा मेळावा घेण्यात येणार आहे.

सकाळी 11 वाजता मेळाव्याला सुरुवात होईल. मेळाव्यासाठी राज्यभरातून लाखो कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत.

मात्र या मेळाव्याला भाजपमधील बंडखोर आमदार आशिष देशमुख  यांनी पाठ फिरवली आहे.

28 विशेष ट्रेन, विशेष बस

राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून भाजपचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांच्यासाठी भाजपने 28 विशेष ट्रेनची व्यवस्था केली होती. या ट्रेन पनवेल, ठाणे, दादर, सीएसएमटी आणि वांद्रे या स्थानकात थांबणार होत्या. मात्र विशेष ट्रेन असल्याने त्यांना विलंब झाला. ठाणे स्थानकात जी ट्रेन 9 वाजता येणे अपेक्षित होते, ती पाहिली ट्रेन 1 वाजता अली. त्यानंतर इतर रेल्वे आल्या.

या कार्यकार्त्यांना स्टेशन ते बीकेसी मैदानापर्यंत येण्यासाठी खास बेस्ट बस आरक्षित करण्यात आल्या आहेत. ठाणे स्टेशनवरुन सुमारे 70 बसेस सोडण्यात आल्या.

दुसरीकडे बेस्टच्या 170 बसेस आरक्षित करण्यात आल्या आहेत. ज्या रात्रीपासून सकाळपर्यंत फेऱ्या मारत आहेत. यामध्ये 5 एसी बसचा समावेश आहे.

संबंधित बातम्या

भाजपचा स्थापना दिवस, मुंबईत जंगी कार्यक्रम