नवी मुंबई: एका वर्षाच्या बाळाची यकृत प्रत्यारोपण अर्थात लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया यशस्वी झाली.


राम मेस्त्री असे या बाळाचं नाव असून, जन्माच्या काही महिन्यातच त्याला बायलरी अट्रॅशिया या लिव्हर संबंधित दुर्मिळ आजाराने ग्रासले होते.

मेस्त्री कुटुंब हे मूळचे गुजरातमधील आहे. तिथे उपचार उपलब्ध नसल्याने ते नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात आले. यावेळी त्यांच्यासमोर उपचारासाठी येणारा खर्च, तसेच लिव्हर दाता शोधणे अशा अनेक अडचणी होत्या.

अपोलो रुग्णालय तसेच विविध सामाजिक संस्थानी पुढाकार घेत, उपचाराचा खर्च जमा केला. तर बाळाच्या मावशीने पुढाकार घेत आपल्या लिव्हरमधील काही भाग दान करण्याचा निर्णय घेतला.

यामुळेच महाराष्ट्रातील साडे सहाकिलोच्या सर्वात लहान बाळाची लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे.

आता बाळ हसत खेळत ठणठणीत झाला असल्याने मेस्त्री कुटुंबियांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्याजोगा होता.