मुंबई: महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक अर्थात एटीएसने हिंदू जनजागृतीच्या वैभव राऊतच्या घरी धाड टाकून स्फोटकं पकडली. वैभव राऊतच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी धक्कादायक आरोप केला आहे.

वैभव राऊतच्या घरी सापडलेली स्फोटकं मराठा आंदोलनादरम्यान घातपात करण्यासाठी होती. महाराष्ट्रात अराजकता माजवण्याचा प्रयत्न होता, असा सनसनाटी आरोप आमदार आव्हाड यांनी केला आहे. शुक्रवारी 10 ऑगस्टला ट्विट करुन आव्हाड यांनी हा आरोप केला.


“वैभव राऊत व त्याच्या दोन साथीदारांकडून ATS ने जप्त केलेले जवळ-जवळ ८ क्रूड बॉम्ब आणि ५० बॉम्ब बनवण्याची सामुग्री ही मराठा आंदोलनाच्या दरम्यान घातपात करण्यासाठीच होती. महाराष्ट्रात अराजकता माजवण्याचा हा प्रयत्न होता”, असं ट्विट आव्हाड यांनी केलं आहे.

इतकंच नाही तर नक्षलवाद्यांचा वकील म्हणून गडलिंगना अटक होते, तर सनातनचे वकील पुनाळेकर जे बॉम्बस्फोटातल्या आरोपींचं खुलेआम समर्थन करतात त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करायला हवी, अशी मागणीही आव्हाडांनी केली.


नालासोपारा स्फोटकांप्रकरणी राज्यभरातून 12 जण एटीएसच्या ताब्यात

नालासोपाऱ्यात जप्त केलेल्या देशी बॉम्बप्रकरणात राज्यातील विविध भागांमधून 12 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली आहे. ह्या सगळ्यांना मुंबई, पुणे, सातारा, सोलापूर, नालासोपारामधून ताब्यात घेतलं असून त्यांना चौकशीसाठी कोठडीत ठेवण्यात आलं आहे. प्रकरणात भूमिका असल्याचं समोर आलं तर त्यांना अटक केली जाईल, असंही एटीएसने सांगितलं आहे.

नालासोपाऱ्याच्या भांडार आळीतल्या घरातून काल तब्बल 20 देशी बॉम्ब आणि 50 बॉम्ब बनवण्याचं सामान एटीएसच्या पथकाने हस्तगत केले. तसंच हिंदू जनजागृतीच्या वैभव राऊत, शरद कळसकर आणि शिवप्रतिष्ठानच्या सुधन्वा गोंधळकेरला एटीएसने अटक केली होती.

प्रकरण काय आहे?
महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने गुरुवारी रात्री नालासोपाऱ्यातील वैभव राऊत या व्यक्तीच्या घरातून मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त केली. भांडारआळीत राहणाऱ्या वैभव राऊतच्या घरातून एटीएसने ही स्फोटकं जप्त केली. एटीएसने देशी बॉम्बसह, त्यासाठी लागणारी सामग्री जप्त केली.

एटीएसला वैभव राऊतकडे स्फोटकं असल्याची टिप मिळाली होती. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून एटीएसने सापळा रचला होता. गुरुवारी रात्री खात्री करुन वैभव राऊतच्या घरी धाड टाकली असता, एटीएसला स्फोटकांचा साठा आढळला. पोलिसांनी वैभवाला ताब्यात घेऊन अधिक चौकशी सुरु केली आहे.

सनातन संस्थेचं स्पष्टीकरण
वैभव राऊत हा सनातनचा साधक नाही, पण तो हिंदुत्ववादी कार्यकर्ता, त्याच्या घरी स्फोटकं सापडणं शक्य नाही, पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे, गृहमंत्री वारंवार सनातन संस्थेला बदनाम करत आहेत. वैभवला शक्य ती सर्व मदत करु, अशी प्रतिक्रिया सनातन संस्थेचे वकील संजीव पुनाळेकर यांनी एबीपी माझाला दिली.

संबंधित बातम्या 

नालासोपारा स्फोटकांप्रकरणी राज्यभरातून 12 जण एटीएसच्या ताब्यात  

स्फोटकप्रकरणी आणखी दोघे अटकेत, ATS ची धडक कारवाई सुरुच 

महाराष्ट्रातल्या घातपाताचा कट एटीएसने उधळला 

'सनातन' साधकाच्या घरी स्फोटकांचा साठा, नालासोपाऱ्यात ATS ची धाड