मुंबई : रखडलेले रिझल्ट लावण्यासाठी फक्त 8 दिवस हाताशी उरले असताना मुंबई विद्यापीठानं नागपूर विद्यापीठाकडे मदतीसाठी धाव घेतली आहे. आठ दिवसांत 22 लाख उत्तरपत्रिका तपासण्याचं आव्हान मुंबई विद्यापीठासमोर आहे.

बीकॉमच्या 7 लाखांपैकी 2 लाख उत्तरपत्रिका नागपूर विद्यापीठात तपासण्यासाठी पाठवण्यात येणार आहेत. निकालाला उशिर होत असल्यानं आधीच विद्यार्थी चिंतेत सापडले आहेत. मुंबई विद्यापीठातल्या तब्बल 22 लाख उत्तरपत्रिका तपासणी झाली नसल्यानं विद्यार्थी, पालक, प्राध्यापकांकडून विद्यापीठाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई विद्यापीठातील परीक्षा यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे, तर दुसरीकडे राज्यपालांनी कोणत्याही परिस्थितीत 31 जुलैच्या आत पदवीधर अभ्यासक्रमांचे निकाल घोषित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या निर्देशांचं पालन करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांनी नागपूर विद्यापीठाकडे मदत मागितली.