मुंबई : 'बचना है तो ऐ मेरे दोस्त, आओ खेले मेंढीकोट' मुंबईतील माहिम, दादर, वांद्रे परिसरात अशी वाक्यं तुम्ही कुठे ना कुठे हमखास वाचली असतील... कुणालाच अर्थ न उलगडणारं हे वाक्य सध्या मुंबईकरांचं लक्ष वेधून घेत आहे.

हा डायलॉग आहे... जाहिरात आहे... की आणखी काय? याबाबात महापालिकेच्या वॉर्डने तक्रार दाखल केली, पण तपास काहीच झाला नाही. येथे अंमली पदार्थ मिळतात असा संदेश देणारं हे सांकेतिक वाक्य असावं असा अंदाज लावला जात आहे.

मुंबईतल्या भिंती, बिलबोर्ड्सवरही या चित्रांची छाप पडली आहे. सोशल मीडियावर शंका-कुशंकांना उधाण आलं आहे. त्रिकोणाची आकृती, त्याखाली नागमोडी रेषा... काही ठिकाणी मानवसदृश्य आकृत्या... असं चित्र भिंतींवर पाहायला मिळतं.



माहिमच्या व्हिक्टोरिया चर्चवर, दादरमधल्या कोहीनूर स्क्वेअरच्या भिंतीवरही ही चित्रं आढळली आहेत. एक माणूस अगदी दोन-तीन मिनिटांत हे चित्र काढून गेला, काय करत आहेस, असं विचारल्यावर उत्तर मिळालं नाही, असं प्रत्यक्षदर्शी सांगतात.



राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर मत मांडण्यासाठी बँक्सी या प्रसिद्ध चित्रकाराची चित्र रस्त्यांवरील भिंतीवर काढण्यात येतात. ही चित्रं बँक्सीच्या चित्रांशी जास्त प्रमाणात मेळ खात नाहीत. जगातील अनेक शहरातील रस्त्यांवर, पुलांवर बँक्सीची अशी चित्रं आहेत, मात्र ह्या वेगळ्या चित्रांच्या माध्यमातून काही गूढ संदेश कोणापर्यंत पोहचवण्याचे काम होत आहे का? हे देखील अत्यंत महत्वाचे आहे.