मुंबई : रिओ ऑलिम्पिकमध्ये ज्या चुका झाल्या, त्या टाळून आता एकच लक्ष्य ते म्हणजे 2020 मध्ये होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावणं, असा निर्धार धावपटू ललिता बाबरने व्यक्त केला आहे. ती एबीपी माझाशी बोलत होती.


 

रिओ ऑलिम्पिकमध्ये स्टिपलचेस क्रीडा प्रकारात अंतिम फेरीत धडक मारलेल्या साताऱ्याची ललिता बाबर मायदेशी परतली.  विमानतळावर ललिताचं जंगी स्वागत करण्यात आलं. ललिताने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी ललिताचं सत्कार केला.

 

यावेळी एबीपी माझाशी बोलताना ललिता म्हणाली, "ऑलिम्पिकचा प्रवास स्वप्नवत होता. पी टी उषानंतर पहिल्यांदाच कोणी महिला आणि त्यातही महाराष्ट्रातील खेळाडूने ऑलिम्पिकची फायनल गाठली याचा आनंद आहे. मात्र रिओ ऑलिम्पिकमध्ये ज्या चुका झाल्या, त्या टाळून आता 2020 मध्ये होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावण्याचं लक्ष्य आहे", असं ललिता म्हणाली.

 

क्लास वन अधिकारीपदावर नोकरी

दरम्यान, रिओ ऑलिम्पिकमध्ये दिमाखदार कामगिरी करणाऱ्या ललिताला राज्य सरकार क्लास वन अधिकारीपदी नोकरी देणार आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीचं तसं आश्वासन दिल्याचं ललिताने एबीपी माझाला सांगितलं. राज्य सरकारने ऑलिम्पिकपूर्वीच मला मदत केली होती, तसंच आता ऑलिम्पिकनंतरही मदत करत आहेत, त्यामुळे मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आभारी आहे, असं ललिता म्हणाली.

 

ललिताची रिओ ऑलिम्पिकमधील कामगिरी

साताऱ्याच्या ललिता बाबरनं ऑलिम्पिक फायनलमध्ये सहभागी होणारी महाराष्ट्राची पहिली धावपटू बनण्याचा मान मिळवला. पण ललिताला तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीत दहाव्या स्थानावर समाधान मानावं लागलं.

 

ललितानं 9 मिनिटं आणि 22.76 सेकंदांची वेळ नोंदवून टॉप टेनमध्ये स्थान मिळवलं. या शर्यतीत बहारिनच्या रूथ जेबेटनं आठ मिनिटं आणि 59.75 सेकंदांची वेळ नोंदवत सुवर्णपदक मिळवलं. तर केनियाच्या जेपकेमॉयनं रौप्य आणि अमेरिकेच्या एमा कोबर्ननं कांस्यपदक पटकावलं.

संबंधित बातम्या


ललिता बाबर लवकरच क्लास वन ऑफिसर, फडणवीसांकडून गौरव


रिओ ऑलिम्पिक : ललिता बाबर स्टीपलचेस शर्यतीत दहाव्या स्थानावर


सह्याद्रीच्या लेकीनं राखली हिमालयाची शान