मुंबई : चेस दी व्हायरस मोहिमेमुळे आपण या साथीला चांगले रोखले. पूर्वी झोपडपट्टी व वसाहतीत वाढलेला प्रादुर्भाव आता उंच इमारती, मोठ्या सोसायट्या आणि उच्चभ्रू वस्तीत मोठ्या प्रमाणावर आढळत आहे. 80 ते 85 टक्के रुग्ण या भागातून आहेत. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी 15 सप्टेंबरपासून माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही राज्यस्तरीय मोहीम राबवित असल्याचं मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. मुंबईत ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष, नगरसेवक, स्वयंसेवी संस्था, गणेश मंडळे यांची मदत घ्या, त्यांना सहभागी करून घ्या, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महानगरपालिका वॉर्ड अधिकारी, उपायुक्त, वैद्यकीय अधीक्षक, अधिष्ठाता यांच्यासोबत आज बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला विविध सूचना दिल्या आहेत.


पुण्यातील लॉकडाऊन व्यापाऱ्यांच्या दबावामुळे हटवला, अजित पवारांचा खुलासा


बैठकीतील महत्वाचे मुद्दे




  • सार्वजनिक तर ठीक आहे, पण वैयक्तिक स्वच्छतेला खूप महत्व देणे गरजेचे. मास्क हा या पिढीसाठी आवश्यक बाब बनली आहे. लोकांनी स्वतःहून काळजी घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने जागृती करणे आवश्यक आहे.

  • आपण धारावी आणि वरळीत करून दाखविले, त्यासाठी आपले कौतुक झाले पण हुरळून न जाता ढिलाई न दाखवता अधिक जोराने काम करा. दिवसाला 1000 किंवा 1100 रुग सापडत असताना आपण या साथीच्या शिखरावर आहोत, असे वाटत होते. पण गेल्या दोन दिवसांपासून 1900 आणि 1700 रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे पुढील दोन तीन महिने हे आव्हान आपल्याला अधिक समर्थपणे पेलायचे आहे हे निश्चित आहे.

  • सध्या आपण मुंबईत आणखी 5 ते 6 हजार बेडस उपलब्ध करून देऊ शकतो. पण पुढील काळात सुविधाही आणखी वाढवावी लागणार तसेच ऑक्सिजन बेड आणि आयसीयू बेडच्या नियोजनाची गरज आहे.

  • मुंबईतच नव्हे तर राज्यातील कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन राज्यात ऑक्सिजनचे उत्पादन वाढवून ते जास्तीतजास्त प्रमाणात वैद्यकीय कारणासाठी उपयोगात आणणे असे आदेश काढावे लागतील.

  • ट्रेकिंग आणि ट्रेसिंग वाढवून एकेका रुग्णाचे 20 नव्हे तर 30 संपर्क शोधणे आणि 48 तासांच्या आता त्या हाय रिस्क संपर्काची चाचणी करणे खूप आवश्यक आहे.

  • लोकांना वाटते जम्बो रुग्णालयांत त्यांना उपचार मिळणार नाही पण वास्तविक पाहता जगात जे काही उपलब्ध आहे त्या डायलिसीस, आयसीयूच्या उत्तम सुविधा याठिकाणी आहेत. मोठ्या खासगी रुग्णालयांत जे आहे ते सर्व याठिकाणी असून पालिकेने अतिशय उत्कृष्ट दर्जाची सुविधा, डॉक्टर्स याठिकाणी दिल्या आहेत.

  • कोविडमधून बरे झालेल्या काही रुग्णांत काही दुष्परिणाम दिसत आहेत. मात्र, हे दुष्परिणाम कोविडचे आहेत की जे औषधोपचार केले आहेत. त्याचे आहेत हेही पाहिले पाहिजे.

  • पोस्ट कोविड उपचारांना तितकेच महत्वाचे आहे. त्यासाठी चांगली व्यवस्था उभारा. औषध नसले तरी उत्कृष्ट रुग्ण सेवा आवश्यक आहे. यामुळे मृत्यू दर कमी होऊ शकतो. नुसते बेडस, औषधे दिले म्हणजे आपण सुटलो असे नाही, रुग्ण सेवा चांगली पाहिजे. शिथिलता दूर करा, चूक शोधा आणि पाऊले टाका.


Ajit Pawar on Pune Lockdown | पुण्यातील लॉकडाऊन व्यापाऱ्यांच्या दबावामुळे हटवला,अजित पवारांचा खुलासा