कल्याण : उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांना जाब विचारल्याने तरुणाची हत्या करण्यात आली आहे. उल्हासनगरच्या खेमाणी परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. संपूर्ण प्रकार घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. चंदू मोरे असं या हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.


उल्हासनगरच्या खेमाणी परिसरात राहणारा चंदू एका कपड्याच्या दुकानात सेल्समन म्हणून नोकरीला होता. रविवारी संध्याकाळी तो याच परिसरात दोन मित्रांसोबत चायनीज खायला निघाला असताना तीन तरुण रस्त्यावर लघुशंका करताना त्याला दिसले. त्यावेळी त्याने त्यांना हटकत सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करू नका असं सांगितलं.


मात्र याचा या तिघांना राग आला आणि त्यांनी काही वेळाने तिथे येऊन चंदू आणि त्याच्या मित्रांवर चॉपर, तलवारीने हल्ला चढवला. यात चंदूच्या पोटात चाकू खुपसल्यानं तो गंभीर जखमी झाला.


जखमी चंदूला आधी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात आणि तिथून कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी आरोपी रवी जैस्वारला अटक करत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. रवीला न्यायालयानं चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून त्याच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध आहेत.