आधीच वाहतूक कोंडी, त्यात टोलवसुली; वाहनचालक त्रस्त
एबीपी माझा वेब टीम | 10 May 2018 04:02 PM (IST)
ही टोलवसुली बंद करण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
ठाणे : मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीच्या कामामुळे ठाण्यात येणाऱ्या वाहनांना ऐरोली आणि मुलुंडहून फिरुन यावं लागतं आहे. मात्र या रस्त्यावर दोन टोलनाके असून आधीच असलेली वाहतूक कोंडी आणि त्यात टोलसक्ती यामुळे वाहनचालक पुरते वैतागले आहेत. वाहनचालकांनीही या टोलवसुलीविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. शिळफाट्याकडून महापे, घणसोली, ऐरोलीमार्गे ठाण्यात येताना ऐरोली आणि मुलुंड असे दोन टोल वाहनचालकांना भरावे लागत आहेत. आधीच या संपूर्ण मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी असल्याने वाहनचालक हैराण झाले आहेत. त्यात पुन्हा टोल भरावा लागत असल्यानं वाहनचालकांचा संयम सुटण्याची शक्यता आहे. ही टोलवसुली बंद करण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यासाठी अनुकूल नाहीत. त्यामुळे सोमवारी याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा आव्हाडांनी दिला आहे.