दादरमधील राजर्षी शाहू सभागृहात काल मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड बंदची हाक देण्यात आली होती. बंदच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
नवी मुंबई, पनवेल बंद
वाशीतील माथाडी भवनात सकल मराठा समाजाची बैठक पार पडली. या बैठकीत आज नवी मुंबई आणि पनवेल बंदची घोषणा करण्यात आली होती.
मुंबई बंद LIVE UPDATE
7.55 PM - नारायण राणे ‘वर्षा’ बंगल्यावर दाखल, मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार
05.40 PM मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढण्याची आमदार हर्षवर्धन जाधव यांची मागणी
05.40 PM शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधवांचा राजीनामा, ईमेलद्वारे विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा पाठवला
05.35 PM ठाण्यातील आंदोलनात समाजकंटकांचा शिरकाव, ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांचा दावा
05.15 PM घणसोली स्टेशनजवळचा रेलरोको थांबला, लोकल वाहतूक सुरु
05.10 PM ठाणे वाशी ट्रान्सहार्बर रेल्वे तीन तासांनंतर सुरु
05.05 PM मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक सुरु
05. 00 PM नवी मुंबई कळंबोलीतील रास्ता रोको तब्बल सहा तासांनी मागे
2.40 PM मुंबई, ठाणे, नवी मुंबई बंदही स्थगित, मराठा क्रांती सकल मोर्चाची घोषणा
2.38 PM मराठा क्रांती सकल मोर्चाकडून मुंबई बंद स्थगित
2.36 PM अन्यायाविरुद्ध मराठा समाज एकत्र आला, सरकारमुळे आमच्या हातात दगड, काठ्या आल्या
2.28 PM मुंबई ट्रान्सहार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प, ठाणे-वाशी, ठाणे नेरुळ मार्गावरील सेवा बंद
1.13 PM या सर्व परिस्थितीला तोंड देताना सरकारला जड जातं आहे. नेतृत्त्व बदलाचा निर्णय मोदी-शाहांना घ्यायचा आहे. मोदी सध्या परदेशात आहेत, पण राज्यातली परिस्थिती चिंताजनक आहे : संजय राऊत
1.07 PM सकल मराठा क्रांती मोर्चा मुंबई समन्वयकांची दुपारी 2 वाजता दादरमधील शिवाजी मंदिर इथे पत्रकार परिषद
1.00 PM नवी मुंबई : घणसोलीमध्ये मराठा आंदोलकांचा ट्रेनवर चढून रेलरोको
12.44 PM मुंबई : वरळीत मुंडन करुन मराठा आंदोलकांनी सरकारचं श्राद्ध घातलं https://goo.gl/JrfWjB
12.05 PM कल्याण : मराठा समाजाच्या भव्य मोर्चाला सुरुवात, हजारो आंदोलक सहभागी
11.47 AM सांगली कृष्णा नदी पात्रातील जलसमाधी आंदोलन संपले, कार्यकर्ते नदीबाहेर
11.23 AM दादरमध्ये सकाळी 11 नंतरही सर्व दुकानं बंद, अत्यावश्यक सेवा सुरु
11.10 AM नाशिक : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे गंगापूर धरणात आंदोलन, 20 कार्यकर्ते ताब्यात
11.01 AM नाशिक : शालीमार परिसरात मराठा आंदोलकांकडून व्यावसायिकांची दुकानं बंद, आंबेडकर पुतळ्याजवळ जोरदार घोषणाबाजी, मोठा पोलिस फौजफाटा तैनात
10.57 AM रायगड : मराठा आंदोलनामुळे मुंबई-गोवा हायवेवर पनवेलकडे जाणारी वाहतूक पळस्पेजवळ वळवली
10.45AM अकोल्यात मराठा समाजानं पुकारलेल्या बंदला मोठा प्रतिसाद. शहरातील मुख्य बाजारपेठ, शाळा-महाविद्यालयं पूर्णत: बंद. शहरात मोठा पोलीस बंदोबस्त
10.40 AM दादर पूर्व स्टेशन बाहेर आंदोलकांचा रस्त्यावरच ठिय्या, दादर, हिंदमाता, परिसरातील दुकाने बंद केली, केईएम, टाटाकडे जाणारी टॅक्सी सेवा रोखली
10.30 AM मुंबईच्या प्रवेशद्वारावर मराठा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आरक्षणासाठी बंद आणि रस्ता रोको केला. पोलिसांनी सामंजस्य दाखवत काही वेळ या कार्यकर्त्यांना रस्त्यावरही बसू दिलं. यामुळे काही वेळ सर्व बाजूंनी वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर या कार्यकर्त्यांना समजावत रस्त्यावरून बाजूला झाले आणि वाहतूक पुन्हा सुरळीत झाली. काही कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे पुन्हा रस्त्यावर उतरत असताना त्यांना समजावत बाजूला केले.
10.30 AM कल्याण - शिवाजी चौकात मराठा मोर्चेकरी दाखल होण्यास सुरुवात, मोर्चेकऱ्यांची मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, कसारा या भागातले मराठा कार्यकर्ते मोर्चात सहभागी
10.29 AM दादरमध्ये शिवसेना भवनकडे येणारा रस्ता मराठा आंदोलकांनी रोखला
10.26 AM घाटकोपर भटवाडी इथे आंदोलकांची गर्दी, दुकानदार, भाजीवाल्यांना दुकानं बंद करण्याचं आवाहन, बस थांबवल्या
10.25 AM ठाणे- लोकलवर दगडफेक, ट्रेन रोखल्या
10. 16 AM मराठा आंदोलकांच्या घोषणाबाजीनंतर लालबागचा राजा मार्केटमधील सर्व दुकानं बंद
10.15 AM ठाणे स्टेशनवर मराठा आंदोलकांनी लोकल रोखली, आंदोलकांना ट्रॅकवरुन हटवण्याचा प्रयत्न
10.05 AM वांद्र्यात मराठा आंदोलकांकडून दुकानदारांना हात जोडून दुकानं बंद करण्याची विनंती
10.03 AM नवी मुंबई : कोपरखैरणेत मराठा आंदोलकांनी रस्ता अडवला, सर्व दुकाने बंद
10.03 AM ठाण्यात मॅकडोनाल्ड्स बंद करण्यासाठी मराठा आंदोलक आक्रमक, पोलिसांनी आंदोलकांना हटवलं
9.53 AM नालासोपारा तुलिंज रोड येथून मराठा सामाजाचा मोर्चा निघाला आहे. दुकान बंद करत आहेत. रस्त्यावर ठिय्या मांडून कार्यकर्त्यांनी वाहने अडवली आहेत.
9.41 AM परळ-शिवडी भागात मराठा आंदोलक रस्त्यावर, दुकानं बंद करण्यास सुरुवात, सरकारविरोधी घोषणाबाजी करत परळ गावातून मोर्चा निघाला
9.36 AM आंदोलनाआधी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक वीरेंद्र पवार यांची माहिती
9.25 AM ठाण्यात दुकानं बंद, फक्त रस्त्यावरुन वाहतूक सुरु
9.15 AM शांततेत आंदोलन करा, मुंबई पोलिसांचं मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांना आवाहन. तसंच कोणतीही अडचण आल्यास किंवा अप्रिय घटना घडल्यास 100 नंबर आणि ट्विटर अकाऊंटवर माहिती द्या - मुंबई पोलिस
8.58 AM ठाणे ते मुंबई रस्त्यावरुन बाजूला झालेले आंदोलनकर्ते पुन्हा रस्त्यावर, पुन्हा वाहतूक रोखली
8.49 AM नवी मुंबई - मनपा परिवहन समितीने 67 एसी बस बंद केल्या आहेत . खबरदारीचा उपाय म्हणून एसी बस बंद. अन्य बस सुरू आहेत.
8.50 AM ठाणे ते मुंबई रस्त्यावरुन आंदोलनकर्ते बाजूला, वाहतूक धीम्या गतीने सुरु
8.30 AM - ठाणे - तीनहात नाक्यावर आंदोलकांची घोषणाबाजी, आरक्षणाची मागणी, मुंबईकडे येणारी वाहतूक रोखली
8.23 AM आजच्या बंदमध्ये अजिंक्यतारा टॅक्सी संघटनेचा सहभाग. संघटनेची एकही टॅक्सी धावणार नाही. अजिंक्यतारा संघटनेच्या 350 हून अधिक टॅक्सी रस्त्यावर धावतात. इतर टॅक्सी संघटनांनाही बंदमध्ये सामील होण्याचं आवाहन
8.20 AM ठाण्यात मुख्यमंत्री हाय हायच्या घोषणा
8.05 AM ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात टीएमटी बसची तोडफोड
7.45 AM घणसोली, नवी मुंबई येथे आज पहाटे दोन बसवर दगडफेक झाल्यामुळे ऐरोली ते वाशीपर्यंत बेस्ट बस सेवा बंद आहे. मुलुंडकडून वाशीच्या दिशेने जाणारी बससेवा ऐरोलीपर्यंत चालविण्यात येत आहे.
7.30 AM - मराठा आरक्षणाला पाठिंबा, मात्र मुंबई बंदला पाठिंबा नाही, शिवसेनेची भूमिका
मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा, मात्र आजच्या बंदमध्ये शिवसेना सहभागी होणार नाही. नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून शिवसेनेचा निर्णय. आजच्या बंदमध्ये सहभागी न होण्याचे सर्व शिवसैनिकांना आदेश. काल खा. चंद्रकांत खैरे यांना झालेल्या धक्काबुक्कीनंतर शिवसेनेची भूमिका.
परळीच मराठा आंदोलनाचं केंद्र
मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या मागण्यांची चर्चा फक्त परळी येथूनच होतील, सरकारने इतर लोकांशी बोलू नये, असे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी सांगितले. त्यांनी एबीपी माझाशी खास बातचित केली.
काय आहेत मागण्या?
- मराठा तरुणांनी सदर बंद शांततापूर्ण वातावरणात पार पाडायचा आहे. आंदोलनात घुसून तोडफोड करणाऱ्या प्रवृत्तीपासून समाजाची बदनामी होणार नाही याबाबत जागरुक राहून बंद यशस्वी पार पाडावा.
- मराठा समाजाचा आक्रोश हा सरकारविरोधी आहे. त्याला जातीय रंग देऊ नये.
- कोणत्याही प्रकारच्या इतर समाजाच्या भावना दुखावणाऱ्या आणि सामाजिक तेढ निर्माण करण्यापासून स्वतःला आणि इतरांना आवर घालावा.
- रुग्णवाहिका आणि अतिमहत्त्वाच्या सेवा देणाऱ्या दवाखाने, मेडिकल यांना बंदसाठी दबाव टाकू नये.
- आंदोलनात घोषणा आणि आपला आक्रोश व्यक्त करत असताना अश्लील भाषा आणि अनुचित शिव्या यांचा वापर करू नये.
- पोलीस प्रशासनाशी हुज्जत ना घालता त्यांच्याशी समन्वय साधून आंदोलन यशस्वी करावे
- इतर समाज बांधवांनी कृपया हे आंदोलन शासनासोबत असल्याने मराठा समाजाला सहकार्य करावे, जेणेकरुण आपल्या सर्वांचे प्रश्न मार्गी लागतील
- भडकावू पोस्ट किंवा व्हिडीओ वायरल न करता आपापल्या जिल्ह्यातील समन्वयक मराठा सेवक यांच्याशी संपर्क ठेवून पोलीस प्रशासनाला गैरप्रकार करणाऱ्या लोकांची माहिती द्यावी
- कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडून आंदोलन चिघळले जाणार नाही याची दक्षता घ्यावी
- पोलीस प्रशासनाने आंदोलन दाबून टाकण्याचा प्रयत्न करून वातावरण चिघळू देऊ नये
- महिला आणि मुले यांना त्रास होणार नाही किंवा त्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी
- कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये अथवा गोंधळ माजेल अशा पोस्ट सोशल मीडियावर टाकू नयेत
- कोणत्याही प्रकारे या आंदोलनाला राजकीय वळण लागू देऊ नये. आपल्या समस्या सोडवणं सर्वपक्षीय नेत्यांची जबाबदारी होती आणि राहील. आपण आपल्या हक्कासाठी रस्त्यावर आहे, राजकारणासाठी नाही याची जाणीव सर्वांनी ठेवून कृती करावी.
निवेदक : सकल मराठा समाज, मुंबई, मराठा क्रांती मोर्चा, मुंबई
मराठा आंदोलकांच्या असंतोषाला आणि चिघळलेल्या परिस्थितीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील जबाबदार असल्याचा आरोप शरद पवारांनी केला आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री विषयाचे गांभीर्य समजण्याऐवजी चिथावणीखोर वक्तव्य करत आहेत. ही बाब खेदजनक असल्याचे पवारांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र बंद
मराठा आरक्षण मागणीसाठीच्या आंदोलनादरम्यान औरंगाबादमध्ये आंदोलक काकासाहेब शिंदे या तरुणाचा गोदावरी नदीत पडून मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधासाठी मराठा क्रांती मोर्चाने 24 जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली होती.
काल सकाळी 11 च्या सुमारास काकासाहेब शिंदे यांच्यावर गंगापूर तालुक्यातील कायगावात अंत्यसंस्कार झाले. लहान भाऊ अविनाश शिंदेने काकासाहेबांच्या पार्थिवाला अग्नी दिला.
सकल मराठा मोर्चाच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात खबरदारी म्हणून शाळा आणि कॉलेजेस बंद ठेवण्यात आली. बीडमधल्या मराठा क्रांती मोर्चाच्या बंदमुळे शहरातून एकही बस शहराबाहेर पडू शकलेली नाही. दररोज बीडमधून ये-जा करणाऱ्या 431 बस फेऱ्या काल बंद होत्या. काही ठिकाणी टायर जाळण्यात आल्यानं एसटी महामंडळानं वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
परभणी रेल्वे स्थानकावर मराठा आंदोलकांनी रास्तारोको केला. यामुळे काही काळ सचखंड , परळी पॅसेंजर आणि हैदराबाद पॅसेंजर ट्रेन रोखण्यात आली होती. रुळावर बसून आंदोलकांनी आंदोलन करत सरकारविरोधात घोषणा दिल्या.
उस्मानाबादमध्येही काल कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. उस्मानाबाद येथील जिल्हा विधीज्ञ मंडळाने एकमतानं मराठा मोर्चाला पाठिंबा दिला. यासोबत नांदेडसह अनेक तालुक्यांमध्ये बंद पाळला जात आहे.
बंद शांततेत पार पाडण्याचं आवाहन
अत्यावश्यक सेवा बंदमधून वगळण्यात आल्या आहेत. वारकरी पंढरपूरहून परत येत आहेत, त्यामुळे बस अडवू नका, बसचं नुकसान करु नये, असे आवाहन सुद्धा मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आले. तसेच,प्रशासनासह सर्व पक्षीय नेते आणि मराठा मोर्चा समन्वयकांनी आंदोलकांना शांत राहण्याचं आणि असं टोकाचं पाऊन न उचलण्याचं आवाहन केलं आहे.
सरकारकडून मदत जाहीर
दरम्यान, सरकारकडून काकासाहेब शिंदे यांच्या नातेवाईकांना दहा लाख रुपये आणि भावाला आठवडाभरात सरकारी नोकरी देण्याचं आश्वासन दिलं आहे. तसंच काकासाहेब शिंदे मृत्यूप्रकरणी गंगापूरचे तहसीलदार चंद्रकांत शेळके आणि पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला या दोघांना निलंबित करण्यात आलं आहे.
चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया
जे आपल्या हातात नाही त्यासाठी आंदोलन करुन उपयोग होणार नाही. मंत्र्याच्या गाड्या फोडून आरक्षण मिळणार असेल तर गाड्या फोडा. आज पंढरपूरमध्ये 7 लाख वारकरी अडकून आहेत. 10 लाख काय 10 कोटी देऊन काकासाहेब शिंदेच्या कुटुंबाची भरपाई करता येणार नाही. बसेस फोडून आरक्षण मिळणार आहे काय? काही पेड लोक या आंदोलानात घुसली आहेत, त्यांना हे आंदोलन बदनाम करायचे आहे. निवडणूक काळात हे प्रकार वाढणार आहेत. पण आंदोलकांनी या पेड लोकांना खड्यासारखे बाजूला करावे, अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
औरंगाबादमध्ये आंदोलकाचा मृत्यू
औरंगाबाद जिल्ह्यातील कायगाव टोका गावात एका मराठा आंदोलकानं गोदावरी नदीत उडी मारली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. काकासाहेब शिंदे असं मृत्यू झालेल्या आंदोलकाचं नाव आहे. काकासाहेब शिंदे याला मच्छीमारांनी नदीपात्रातून बाहेर काढले. त्यानंतर गंगापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
या घटनेनंतर गंगापूर पोलीस ठाण्यासमोर आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केलं. जोपर्यंत मुख्यमंत्र्यांवर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल होत नाही, तोवर मृतदेह स्वीकारणार नसल्याची भूमिका मृत काकासाहेब शिंदेच्या भावानं घेतली आहे.
काकासाहेब शिंदे यांना शहीद घोषित करुन त्यांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची भरपाई देण्यात यावी, हायकोर्टाचा निर्णय येईपर्यंत मेगाभरती रोखावी, स्थानिक अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशा मागण्या मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांनी केल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त
औरंगाबादमधील मराठा आंदोलनकर्त्याच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुख व्यक्त केलं आहे. शिवाय मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली.
मृत काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबाला सर्वोतपरी मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कुठलीही हिंसा किंवा अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष करु नये : संभाजीराजे
औरंगाबादमधील मराठा आंदोलकाच्या मृत्यूची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मराठा समाजाच्या भावना किती तीव्र आहेत हे मी समजू शकतो, असे संभाजीराजे म्हणाले.
तसेच, संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना आवाहनही केले. ते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की, कुठलाही वेळ न दवडता त्यांनी आंदोलकांशी तातडीने चर्चा करावी. केवळ टीव्हीमध्ये आपली बाजू न सांगता मराठा समाजाच्या सर्व घटकांना सर्व नेत्यांना एकत्र बोलावून त्यांच्याशी वन-टू-वन चर्चा करावी. यासंदर्भात सरकारी पातळीवर जे जे शक्य आहे ते करण्यासाठी तातडीने मिटिंग बोलवावी.”
संबंधित बातम्या
संभाजीराजेंच्या दोन सूचना, व्यंकय्या म्हणाले- मुख्यमंत्र्यांना मंदिरात जाऊ न देणं कितपत योग्य?
नेत्यांनी आरक्षणावरुन लोकांची फसगत करु नये: माजी न्या. पी. बी. सावंत