मुंबई : गणरायाच्या आगमनाचे वेध लागले असताना, या बाप्पांची मात्र प्रवासाची तयारी सुरु आहे. ही तयारी साधीसुधी नाहीये. बाप्पांना पॅक केलं जातंय हे पाहून कुणालाही प्रश्न पडेल, की बाप्पा नक्की निघालेत कुठे? तर बाप्पा थेट ऑस्ट्रेलियाला चालले आहेत.

 
ऑस्ट्रेलियात जायचं म्हटल्यावर तयारी तर करावीच लागणार. त्यातही हा महिनाभराचा प्रवास. बाप्पा कांगारुंच्या देशात सुखरुप पोहोचावा म्हणून काळजी घ्यावी लागते ती वेगळीच.

 

 

मुंबईतून बाप्पांची एक बारा फूट उंचीची मूर्ती ऑस्ट्रेलियाला पाठवली जाणार आहे. ऑस्ट्रेलियात युनायटेड इंडियन असोसिएशन ही संघटना गणेशउत्सव साजरा करत आहे. यासाठी तिथल्या भाविकांनी ज्या मूर्तीशालेत लालबागचा राजा घडला, त्या बागवे आर्ट्सची निवड केली.

 

 

हल्ली भारतीय सणांची परदेशात चांगलीच क्रेझ असते. गणेशोत्सव त्याला अपवाद कसा ठरणार. ऑस्ट्रेलियाचा हा राजा आता प्रवासाला निघालाय. मात्र तो कांगारुंनाही भूरळ पाडील, यात शंकाच नाही.