नवी मुंबई : युती होणार की नाही होणार याचं ठोस उत्तर जरी आपल्याला मिळालं नसलं, तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीचे स्पष्ट संकेत दिलेत. महायुती माथाडी कामगारांच्या पाठीशी असल्याचं विधान करत मुख्यमंत्र्यांनी युतीचे संकेत दिलेत. तर उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात येत्या निवडणुकीतही युतीचंच सरकार सत्तेत येणार असं विधान करत युतीबाबत सकारात्मक इशारा दिला आहे.  माथाडी कामगारांचा भव्य मेळावा आणि माजी आमदार अण्णासाहेब पाटील यांची 86 वी जयंती निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.


देवेंद्र फडणवीस काय म्हणाले

या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपला माथाडी कायदा जसा आहे, तसा कायदा देशात लागू करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी प्रयत्न करत आहेत. आमचे युतीचे सरकार आजही आहे आणि उद्याही असणार, त्यामुळे माथाडी कामगारांचे प्रश्न आमच्या सरकारकडून सोडवेल जातील. या पुढेही महायुतीची ताकद माथाडी कामगारांना मिळणार असल्याचं फडणवीस म्हणाले.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

जेवढी माणसे आपल्यात येत आहेत त्यांची नावे लक्ष्यात ठेवणं कठीण झाले आहे. त्यामुळे व्यासपीठावरच्या लोकांची नावे मी घेत नाही. मी प्रथमच या व्यासपीठावर आलोय, आणि तोही उशीरा, त्याबद्दल मी माफी मागतो. उद्याची निवडणूक आम्ही जिंकणार, महायुतीचे सरकार येणार म्हणजे येणारच असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. त्यामुळे युती संदर्भात असणाऱ्या प्रश्नांना पूर्णविराम मिळाला आहे असंच म्हणावं लागेल. तसेच शरद पवार यांच्यावर झालेल्या कारवाईबद्दल बोलताना ते म्हणाले, आम्ही कधीही सुडाचे राजकारण करत नाही आहोत आणि तसं करणार ही नाही.

सेना भाजप मध्ये युक्ती होते की नाही याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेला आहे. अशातच आज एकाच व्यासपीठावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे उपस्थित होते. नवी मुंबईत आज माथाडी कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उद्धव ठाकरे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. कार्यक्रमाच्या नियोजनाप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे वेळेत कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले, मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एक तास उशिरा या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले. त्यामुळे उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहतील की नाही अशी सुरुवातीला शंका व्यक्त करण्यात येत होती. मात्र उद्धव ठाकरे या कार्यक्रमात दाखल झाल्यानंतर संयोजक आणि कार्यकर्त्यांच्या जीवात जीव आला.