मुंबई : भाजपात येणारे सगळे साधुसंत नाहीत, हे एकनाथ खडसे यांचं विधान खरं असल्याचं स्पष्टीकरण शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी दिलं आहे. भाजपमध्ये येणारे अनेकजण पक्षाच्या नियमात बसणारे नाहीत, असेही शेलार म्हणाले. एबीपी माझाच्या 'तोंडी परीक्षा' कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी बोलताना शेलार म्हणाले की, आम्ही भाजपमध्ये इनकमिंग करताना सरसकट दरवाजे उघडलेले नाहीत, त्यासाठी फिल्टर सुरु आहे. भाजपमध्ये संधी ही प्रामाणिक कार्यकर्त्यालाच मिळाली आहे आणि इथून पुढेही मिळेल, असेही शेलार म्हणाले. आमच्या पक्षात सामान्य कार्यकर्त्यांना सर्वाधिक संधी मिळते. मी स्वतः सामान्य परिवारातून आहे. निष्ठावंतांवर अन्याय होणार नाही यासाठी पक्ष काळजी घेतो. मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष योग्यच निर्णय घेतील, असेही ते म्हणाले.
राजकारणामध्ये जिंकण्यासाठी आवश्यक गोष्टी कराव्या लागतात. ज्यांना भाजपमध्ये घेतलं त्यांना आमच्या पक्षातील कार्यकर्त्यांवर अविश्वास म्हणून नाही घेतलं. आम्हाला आमचा पक्ष मोठा करायचा आहे म्हणून केवळ योग्य व्यक्तींनाच प्रवेश दिला जात आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी युतीबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, युती होणार आहे, युतीचे चित्र स्पष्ट आहे, फक्त चित्रामध्ये रंग भरणे सुरु असल्याचे सांगत भाजप 160 जागा लढणार असल्याचेही ते म्हणाले. शिवसेनेबाबत बोलताना त्या वेळच्या परिस्थितीनुसार टीका केली होती, असे शेलार म्हणाले. यावेळी शेलार यांनी शिवसेनेबाबत बोलणं टाळलं असलं तरी आदित्य ठाकरे यांची स्तुती केली. आदित्य ठाकरे यांची तळमळ खूप चांगली आहे. ज्या पद्धतीने ते काम करत आहेत ते चांगलं आहे, असेही ते म्हणाले.
शेलार म्हणाले की, निवडणूक ह्या राज्यातील मुद्यावरच लढल्या जातील. काश्मीर मुद्दा हा आमचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. देशातील विविध शहरात जाऊन गृहमंत्री अमित शाह हे या संदर्भात व्याख्यान देत आहेत. तसाच कार्यक्रम मुंबईत देखील आयोजित केला होता, असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना त्यांनी पक्षाचे नेते एकनाथ खडसे आणि किरीट सोमय्या यांना नक्कीच न्याय मिळेल असंही सांगितलं.
भाजपमध्ये येणारे सगळे साधुसंत नाहीत, हे खरं : आशिष शेलार
निलेश झालटे, एबीपी माझा
Updated at:
25 Sep 2019 06:08 PM (IST)
राजकारणामध्ये जिंकण्यासाठी आवश्यक गोष्टी कराव्या लागतात. ज्यांना भाजपमध्ये घेतलं त्यांना आमच्या पक्षातील कार्यकर्त्यांवर अविश्वास म्हणून नाही घेतलं. आम्हाला आमचा पक्ष मोठा करायचा आहे म्हणून केवळ योग्य व्यक्तींनाच प्रवेश दिला जात आहे, असेही ते म्हणाले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -