गेल्या चार वर्षात भाजपनं फक्त आवाज करणारे फटाके वाजवले : संजय राऊत
एबीपी माझा वेब टीम | 07 Nov 2018 07:31 PM (IST)
वर्षातून एकदाच फटाके वाजवतो, वाजवू द्या काय फरक पडतो, असेही राऊत यावेळी म्हणाले. प्रथा परंपरेवर निर्बंध आणले तर विरोध कसा होतो, हे आपण शबरीमालाचं प्रकरण झाल्यावर पाहिले त्यामुळे सणांवर निर्बंध आणू नये, असेही ते म्हणाले.
मुंबई : गेल्या चार वर्षात भाजपनं फक्त आवाज करणारे फटाके वाजवले. आम्ही लवंगी लावत नाही, शिवसेनेनं दारू गोळा जमा केला आहे. याची वात मातोश्रीवर आहे. उद्धव साहेब ती पेटवतील, अशा शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा भाजपवर हल्लाबोल केला आहे. तर हिंदूंचे सण आले का निर्बंध येतात असं म्हणत राऊत यांनी आपल्या कुटुंबियांसोबत फटाके देखील फोडले. वर्षातून एकदाच फटाके वाजवतो, वाजवू द्या काय फरक पडतो, असेही राऊत यावेळी म्हणाले. प्रथा परंपरेवर निर्बंध आणले तर विरोध कसा होतो, हे आपण शबरीमालाचं प्रकरण झाल्यावर पाहिले त्यामुळे सणांवर निर्बंध आणू नये, असेही ते म्हणाले. कोर्टाच्या नियमांविरोधात बाळासाहेब उघडपणे बोलायचे. आता आम्ही उघडपणेच करतोय, फटाके फोडण्याच्या नियमाला आम्ही घाबरत नाहीत. आम्ही याबाबतीत अमित शाहांना फॉलो करतोय. ते जसे म्हणतात शबरीमाला प्रकरणी कोर्टाने नियम पाळू नका, तसंच आम्ही इकडे म्हणतोय, वेगळं काय आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.