मुंबई : आईला मारहाण करणाऱ्या मारकुट्या बायकोपासून कोर्टाने तरुणाची सुटका केली आहे. पत्नीच्या क्रौर्यामुळेच मुंबईकर पतीला मुंबई उच्च न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला. बारा वर्षांच्या संसारानंतर दोघांचा काडीमोड झाला.
आपली पत्नी कर्करोगग्रस्त आईला नेहमी मारहाण करायची, त्याचप्रमाणे आपल्याविरोधात हुंडा मागितल्याची आणि आपल्या भावाविरोधात विनयभंगाची खोटी तक्रार पत्नीने दाखल केली होती, असा दावा पतीने कोर्टात केला होता.
या जोडप्याचा विवाह 2006 मध्ये झाला होता. त्यानंतर दक्षिण मुंबईत नरिमन पॉईंटमधील घरात हे जोडपं कुटुंबीयांसह राहत होतं. लग्नाच्या वर्षभरानंतर महिलेने एकदा सासूच्या श्रीमुखात लगावली होती. त्यानंतरच या मारहाण प्रकरणाला सुरुवात झाली.
नोव्हेंबर 2007 मध्ये महिलेने सासरच्या मंडळींविरोधात हुंड्यासाठी छळ केल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र पती आणि सासऱ्यांची सहा तास चौकशी केल्यानंतर दोघांना पोलिसांनी दिलासा दिला होता.
महिलेने केलेल्या छळवादामुळे कुटुंबाची प्रतिमा मलीन झाली आहे. हिंदू विवाह कायद्यानुसार हे क्रौर्य असल्याचं निरीक्षण हायकोर्टाने नोंदवलं. कोर्टाने तरुणाला घटस्फोट मंजूर करतानाच संबंधित महिलेला 50 हजार रुपयांची रक्कम पतीला देण्याचे आदेश दिले आहेत.
पतीने पत्नीला दरमहा 15 हजार रुपये देखभाल खर्च द्यावा, हा फॅमिली कोर्टाने दिलेला आदेश उच्च न्यायालयाने धुडकावला. मात्र पत्नीसोबत राहणाऱ्या मुलाला पतीने देखभाल खर्च देण्याचा फॅमिली कोर्टाचा निर्णय अबाधित ठेवण्यात आला आहे.