मुंबई : मुंबई ही जगाच्या नकाशावर चौथं सर्वात प्रदूषित शहर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं केलेल्या हवा प्रदूषणाच्या चाचणीत मुंबईत सर्वाधिक प्रदूषण होत असल्याचं निष्पन्न झालं आहे.
गेल्या वर्षी मुंबई पाचव्या क्रमांकावर होती. पण आता शहरातील हवा प्रदूषणात आणखी वाढ झाली आहे. तर, याच चाचणीत दिल्ली क्रमांक एक म्हणजे जगातील सर्वात प्रदूषित शहर असल्याचं म्हटलं आहे.
दिल्लीपाठोपाठ, कैरो, ढाका आणि त्यानंतर मुंबई अशी पहिल्या 4 प्रदूषित शहरांची नावं आहेत. त्यामुळे, जगातील दर 10 माणसांपैकी 9 लोक प्रदूषित हवेनं श्वासोच्छवास करत असल्याचा उल्लेखही या अहवालात करण्यात आला आहे.
यामुळे दरवर्षी वायू प्रदूषणामुळे जगभरात 70 लाख लोकांचा मृत्यू होत असल्याची माहितीही या अहवालातून समोर आली आहे. तसंच वायू प्रदूषणामुळे हृदयासंबंधीच्या समस्या, श्वसन रोग यासरख्या समस्यांमध्येही वाढ होत असल्याचं समोर आलं आहे.