मुंबई : ज्येष्ठ पत्रकार ज्योर्तिमय डे यांच्या हत्येप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला दोषी ठरवण्यात आलं आहे, तर पत्रकार जिग्ना वोरा यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

मुंबईतील विशेष मकोका कोर्टाने हा निर्णय दिला आहे. पुरावे आणि साक्षीनुसार छोटा राजन हा जे डेंच्या हत्येचा कट रचणारा मुख्य सूत्रधार असल्याचं समोर आलं होतं. छोटा राजनला काय शिक्षा सुनावली जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

छोटा राजन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात उपस्थित होता.

जे डे हत्या प्रकरणी 13 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा फरार आहे. उर्वरित 11 जणांपैकी जोसेफ पॉलसन आणि जिग्ना वोरा या दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

छोटा राजन, सतीश काल्या, अभिजीत शिंदे, अरुण डाके, सचिन गायकवाड, अनिल वाघमोडे, निलेश शेंडगे, मंगेश अगरवाल आणि दीपक सिसोडीया हे नऊ जण दोषी सिद्ध झाले आहेत.

छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण सिद्ध झाल्यास छोटा राजनला फाशीची शिक्षा सुनावली जाऊ शकते, पण ती शक्यता कमी आहे.



काय आहे प्रकरण?

छोटा राजन आणि दाऊद इब्राहिम यांच्यातील गँगवारच्या वादात अनेकांचे बळी गेले आहेत. याच वादाचा बळी जे डेही ठरले होते. 11 जून 2011 रोजी मुंबईतील पवईमध्ये हिरानंदानी परिसरात जे डे यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

जे डे यांची हत्या छोटा राजन गँगमार्फत करण्यात आल्याचं समोर आलं होतं. या हत्येमध्ये पत्रकार जिग्ना वोराचं नावसुद्धा जोडलं गेलं होतं. जे डे यांच्या हत्येमुळे संपूर्ण मीडिया विश्वात खळबळ माजली होती.

पुरावे आणि साक्षीनुसार, छोटा राजन हा जे डेंच्या हत्येचा कट रचणारा मुख्य सूत्रधार असल्याचं समोर आलं. तर, राजनच्या संभाषणात जिग्ना वोराचा उल्लेख होता. जिग्नाच्या सीडीआर पुराव्यानुसार ती छोटा राजनच्या सातत्याने संपर्कात असल्याचं आढळून आलं.
संबंधित बातम्या :

पुस्तकामुळे पत्रकार जे. डे यांची हत्या, सीबीआयचा  आरोपत्रात दावा
पत्रकार जे. डेंच्या हत्येप्रकरणी छोटा राजनला शिक्षा होण्याची शक्यता