मुंबई : मुंबई लोकलमध्ये स्टंटबाजी करणं विक्रोळीतील 18 वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. विक्रोळीतील पार्कसाइट भागात राहणाऱ्या गणेश इंगोलेचे कळव्याच्या खाडीत पडून मृत्यू झाला.
गणेश 11 जूनला घरी न आल्याने घरच्यांना चिंता वाटायला लागली. त्यांनी गणेशचे मित्र, नातेवाईक यांच्याकडे चौकशी केली. मात्र गणेशचा कुठंच पत्ता लागत नव्हता. अखेर गणेशच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनला मिसिंगची तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी गणेशचा तपास सुरु केला.
प्रत्येक स्टेशनचे सीसीटीव्ही चेक केले तेव्हा विक्रोळी स्टेशनवर तो त्याच्या मित्रासोबत जाताना दिसला. मात्र कळवा स्टेशनच्या सीसीटीव्हीमध्ये तो त्याच्या मित्रासोबत लोकलमधून उतरताना दिसला नाही. त्यामुळे पोलिसांनी गणेशच्या मित्रांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली. तेव्हा गणेश कळवा खाडीत पडल्याचं त्याच्या मित्रांनी पाचव्या दिवशी उघड केलं.
गणेश इंगोले हा डान्स क्लासला जायचा. वेगवेगळे स्टंट करण्याची त्याला आधीपासून सवय होती. असेच स्टंट तो लोकल प्रवासादरम्यान करायचा. 10 जूनला आपल्या मित्रांसोबत विक्रोळीहून कळव्याला जाताना अशाच प्रकारचे स्टंट तो करत होता. त्यावेळी तोल जाऊन तो कळवा खाडीत पडल्याचं पोलिसांसमोर त्याच्या मित्रांनी कबूल केलं.
या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज नसल्याने हा कळवा खाडीत खरंच तोल जाऊनच पडला का ? याचा तपास पोलीस करत आहेत.
पोलिसांनी कळवा खाडी शोधून काढली असून अद्याप पोलिसांना गणेशचा तपास लागला नाही. अजूनही पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी ठाणे, नवी मुंबई भागातील पोलीस स्टेशन, रुग्णालय यांनाही गणेश इंगोले केसबाबत कळवलं असून त्याचा कसून तपास पोलीस करत आहेत.
लोकलमध्ये अनेकदा अशी स्टंटबाजी करणारी तरुणांची टोळकी बघायला मिळतात. पोलिस, रेल्वे प्रशासनाकडून याबाबत जनजागृती करणारे फलक असूनही त्याकडे कानाडोळा करुन अनेक जण हा मृत्यूचा खेळ सर्रास खेळताना दिसतात. त्यांनी वेळीच सावध होणं गरजेचं आहे.