अंबरनाथ : संदीप कदम शिवसैनिक नाही. शिवसेनेने त्याची कोणतीही फसवणूक केलेली नाही, असं सांगत शिवसेनेने हात झटकले आहेत. युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंच्या स्वागतासाठी पक्षाने तब्बल 3 लाखाचं बिल थकवल्याने उपासमारीची वेळ आल्याचा आरोप संदीप कदम यांनी केला आहे.
मात्र संदीप कदम यांचा आरोप चुकीचा असून शिवसेनेशी त्यांचा काडीमात्र संबंध नाही, असंही पक्षाने स्पष्ट केलं आहे.
संदीप कदम शिवसेनेचे कार्यकर्ते नाहीच, पण त्यांचा अंबरनाथमधील शिवसेनेशीही संबंध नाही. संदीप कदम असे आरोप करुन पक्षाला, माजी नगाध्यक्ष सुनील चौधरी आणि आमदार बालाजी किणीकर यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचं वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.
संबंधित बातमी : आदित्य ठाकरेंच्या स्वागतामुळं शिवसैनिकाच्या डोक्यावर कर्जाचा बोजा
काय आहे प्रकरण?
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे 2014 साली अंबरनाथ दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी कमानी आणि झेंडे लावून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं होतं. याचं काम स्थानिक शिवसेना शाखेने संदीप कदम यांना दिलं होतं. पण दौरा झाल्यानंतर, याचं तब्बल तीन लाखांचं बिल पक्षाने थकवल्याने संदीप यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढला आहे.
यातच बिलासाठी चकरा मारताना संदीपला अर्धांगवायूचा झटका आला. त्यामुळं मागील वर्षभरापासून तो अंथरुणाला खिळून आहे. त्यामुळं तीन मुलींच्या पालनपोषण, शिक्षणासह घरखर्च भागवण्यासाठी संदीपच्या पत्नीला घरकाम करण्याची वेळ आली आहे.
संदीप कदमला जुगाराचं व्यसन : माजी नगराध्यक्ष
संदीप कदमने आतापर्यंत पालिका अधिकाऱ्यांना वेगवेगळी कारणे सांगून पैसे उकळले आहेत. त्याला जुगाराचं व्यसन असून त्याने पैसे उडवले आहे. आजाराची सहानुभूती मिळवण्यासाठी संदीप सोशल मीडियावर अफवा पसरवत आहे. मदतीसाठी त्याने स्वतःचा नंबरही दिला असून त्याला अनेक ठिकाणांहून आर्थिक मदतही मिळत आहे, असा आरोप शिवसेनेच्या माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी केला आहे.