मोबाईलवर खेळताना सातव्या मजल्यावरुन पडून तरुणाचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 07 Mar 2017 04:02 PM (IST)
मुंबई : मोबाईलवर खेळण्याच्या नादात मुंबईतील 18 वर्षीय तरुणाला जीव गमवावा लागला आहे. सांताक्रुझमधील वाकोला परिसरात राहणाऱ्या अभिषेक कांबळेचा सातव्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला. आयटीआयचा विद्यार्थी असलेला अभिषेक इमारतीच्या गच्चीवर बसून मोबाईलवर खेळत होता. त्यावेळी पाय घसरुन खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला. रविवारी वाकोल्यातील मंगलमूर्ती सोसायटीमध्ये ही घटना घडली. गेल्या तीन दिवसांपासून अभिषेकला फीट्सचा त्रास जाणवत होता. त्यामुळे तो कॉलेजलाही गेला नव्हता, अशी माहिती आहे. मोबाईलवर खेळताना तो पाय घसरुन पडला, फीट्स आल्यामुळे त्याचा तोल गेला, की त्याने आत्महत्या केली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास त्याने अस्वस्थ वाटत असल्याचं सांगितलं, तेव्हा अभिषेकला त्याच्या आईने बाहेर एखादी फेरी मारुन येण्यास सुचवलं. मात्र तो टेरेसच्या चाव्या घेऊन वर कधी गेला, हे समजलंच नाही, असं अभिषेकच्या वडिलांनी सांगितलं आहे. वाकोला पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरु आहे.